पोलिसांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: June 24, 2014 00:03 IST2014-06-23T23:34:38+5:302014-06-24T00:03:23+5:30
अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याची यादीही मुख्यालयात प्रकाशित करण्यात आली आहे.

पोलिसांच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
अहमदनगर : पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल जिल्ह्याच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. याची यादीही मुख्यालयात प्रकाशित करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती संकेतस्थळ, तसेच उमेदवारांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १७९ जागांसाठी नऊ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पैकी सर्व चाचण्यांमधून पात्र झालेल्या २ हजार २५६ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२०) पोलीस परेड मैदानावर लेखी परीक्षा झाली. या लेखी परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. सायंकाळी जिल्ह्याच्या संकेतस्थळावरही निकाल जाहीर करण्यात आला आहे. तसेच लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक उमेद्वारांना किती गुण मिळाले, याची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर याबाबत काही आक्षेप नोंदवायचे असतील तर त्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. या आक्षेपांचा विचार करून त्यामध्ये त्रुटी आढळल्यास किंवा तथ्य आढळले तरच बदल करण्यात येईल. बुधवारी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीवरही आक्षेप घेण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात येईल. त्यानंतर १७९ जणांची अंतिम निवड यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. उमेद्वारांचे पेपर्स, शारीरिक चाचण्यांचे गुण यामध्ये ताळमेळ साधण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते.