आचारसंहितेमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:12+5:302020-12-16T04:36:12+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्येही अनेक कामांवर निर्बंध आले आहेत. आचारसंहितेमुळे विविध बैठका, पदाधिकाऱ्यांच्या ...

आचारसंहितेमुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर निर्बंध
अहमदनगर : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्येही अनेक कामांवर निर्बंध आले आहेत. आचारसंहितेमुळे विविध बैठका, पदाधिकाऱ्यांच्या सभा, तसेच इतर विकासकामे महिनाभर बंद राहणार आहेत.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. १५ जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतमोजणीपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत आता विकासकामांना ब्रेक लागला आहे.
विकासकामांना नव्याने मंजुरी, शासकीय उद्घाटन यावर निर्बंध आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत पदाधिकारी आणि विविध सभापती यांना बैठक घेणे, धोरणात्मक निर्णय घेण्यावरही मनाई असून, महिनाभरानंतर आचारसंहिता संपल्यावर जिल्हा परिषदेच्या नियमित बैठका सुरू होणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत आता महिनाभर प्रशासनाला कारभार हाकावा लागणार आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी मंजूर झालेली विकासकामे सुरू राहणार आहेत. मात्र, त्यांचे जाहीर उद्घाटन करता येणार नाही, असे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.
----------------
धोरणात्मक कामांवर
अधिकारी घेणार बैठक
जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा, स्थायी सभा, तसेच इतर विषय समित्यांच्या सभेत सदस्य सहभागी होत होते; परंतु आता आचारसंहिता लागल्यामुळे सदस्यांना कोणत्याही सभेत भाग घेता येणार नाही. धोरणात्मक सर्व निर्णय आता अधिकारी घेणार आहेत.