सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:29 IST2021-02-26T04:29:04+5:302021-02-26T04:29:04+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पार्शभूमीवर सहकारी संस्था व बँकांच्या सभांवर सहकार खात्याने निर्बंध घातले आहेत. सदस्य संख्या ५० पेक्षा कमी ...

सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांवर निर्बंध
अहमदनगर : कोरोनाच्या पार्शभूमीवर सहकारी संस्था व बँकांच्या सभांवर सहकार खात्याने निर्बंध घातले आहेत. सदस्य संख्या ५० पेक्षा कमी असलेल्या सहकारी संस्थांना सभागृहात सभा घेण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यापेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या संस्थांना मात्र सभा ऑनलाइन घ्याव्या लागणार आहेत. सहकार आयुक्त कार्यालयातील कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी गुरुवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
जिल्ह्यात १ हजार ६८५ सहकारी संस्था आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ सहकारी संस्था व बँकांच्या सभांवर सहकार खात्याने निर्बंध घातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सभांवर मर्यादा आल्या आहेत. ज्या सहकारी संस्थांची सदस्य संख्या ५० हून अधिक आहे, अशा सहकारी संस्थांना सभागृहात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संस्थांना ऑनलाइन सभा घेण्यास सांगण्यात आले आहे. ऑनलाइन सभेची वेळ आणि ठिकाण, याबाबतची माहिती १५ दिवस आधी सभासदांना कळविणे संस्थांवर बंधनकारक आहे. ही माहिती देण्याची जबाबदारी सर्वस्वी संस्थांची आहे. संस्था सभेसाठी कुठले माध्यम वापरणार आहे, याबाबत सदस्यांना कळविणे आवश्यक आहे. ऑनलाइन सभा घेण्यासाठी संस्था एजन्सीची नियुक्ती करू शकते, असेही आदेशात नमूद आहे.
....
फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकार
सदस्य संख्या ५०पेक्षा कमी असलेल्या संस्थांना सभागृहात सभा घेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे.