जिल्ह्यात बस, रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:18+5:302021-06-10T04:15:18+5:30
संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके आता पुन्हा गतिमान होऊ लागली आहेत. रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणेच ...

जिल्ह्यात बस, रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद
संगमनेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके आता पुन्हा गतिमान होऊ लागली आहेत. रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणेच सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बस आणि रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील काही आगारांमध्ये फेऱ्या कमी प्रमाणात होत असल्या तरीही येथे हळूहळू प्रवाशांची संख्या वाढून फेऱ्या पूर्ववत होतील, अशी अपेक्षा आहे.
कोरोनाच्या संसर्गाच्या पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन व दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेले निर्बंध यामुळे दीड वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. दुसऱ्या लाटेतील निर्बंधांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेत समावेश असलेल्यांना बसेसमधून प्रवासाला परवानगी होती. सर्वसामान्यांना प्रवास करण्यावर निर्बंध घातल्याने जिल्ह्यातील सर्वच आगारांमध्ये बसेस उभ्या होत्या. परिवहन महामंडळाच्या बसेस बंद होत्या. या काळात काही खासगी बसेस सुरू होत्या. मात्र, त्यांच्या प्रवास भाड्यात वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती.
राज्यभरात सोमवारी (दि. ०७) निर्बंध शिथिल केल्यानंतर गत दोन महिन्यांपासून बंद असलेली परिवहन मंडळाची बस सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचविणारी लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण ७०० बसेस आहेत. त्यापैकी १६० बसेस पहिल्या दिवशी धावल्या. हळूहळू प्रवाशांची संख्या वाढते आहे. लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
संगमनेर आगारातून जालना, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कासारा, चाळीसगाव, मालेगाव, अहमदनगर या लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच कोपरगाव, अकोले, साकूर येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. इतरही आगारांच्या गाड्या संगमनेरात येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. दुसऱ्या लाटेत रेल्वेच्या गाड्या नेहमीप्रमाणेच सुरू आहेत. निर्बंध शिथिल केल्याने रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा प्रतिसाद वाढणार आहे.
--------------
पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १६० बसेस रस्त्यावर धावल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करण्याला प्रवासी नेहमीप्रमाणेच प्राधान्य देत आहेत. खासगी बसपेक्षा महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो. प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे.
विजय गीते, जिल्हा निरीक्षक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
---------------
पहिल्या वेळेस केलेल्या लॉकडाऊनमध्ये रेल्वेची सेवा बंद होती. आता रेल्वे बंद नव्हती, ती सुरूच आहे. रेल्वेने प्रवास करण्यास प्रवाशांचा पहिल्यासारखा प्रतिसाद आहे. सर्वच रेल्वे गाड्या नियमित सुरू आहेत.
एन. पी. तोमर, रेल्वे स्टेशन मॅनेजर, अहमदनगर
-----------
अहमदनगर बसला प्रवासी अधिक
अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांमुळे अनेकांची जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांमधील असलेली कामे रखडली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी
सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती दिली जाते आहे.
---------------
संगमनेर आगाराच्या अधिपत्याखाली लोणी बसस्थानकदेखील येते. या दोन्ही ठिकाणांहून २०१९ साली दररोज साधारण ५५० फेऱ्या होत होत्या. सध्या ४० ते ४५ फेऱ्या होत आहेत. प्रवासी संख्या वाढेल. शाळा, महाविद्यालये सुरू होतील तसे बसेस नियमित सुरू करण्यात येतील. संगमनेर आगारातून सुटणारी प्रत्येक बस योग्य प्रकारे सॅनिटाईज करण्यात येते. प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांना खाली उतरून देण्याचे निर्देश वाहक, चालकांना दिले आहेत.
नीलेश करंजकर, आगारप्रमुख, संगमनेर आगार
----------
सिझनमध्ये वेगवेगळे व्यवसाय करतो. संगमनेरहून बस पकडून नाशिक रोडला पोहोचतो. तेथून रेल्वेने मुंबईला जातो. कमी वेळात, कमी खर्चात हा प्रवास होत असून, लवकर मुंबईला पोहोचून खरेदी करून एका दिवसात पुन्हा संगमनेरला येणे होते. हे सोईचे ठरते. बससेवा सुरू झाल्याने माझ्यासारख्या अनेक व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.
रोहित रासने, व्यापारी, संगमनेर
-------------
संगमनेर तालुका विस्ताराने मोठा आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बस हा एकमेव पर्याय आहे. ग्रामस्थांना राज्य परिवहन महामंडळाची बस आपली वाटते. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस फेऱ्या लवकरच सुरू कराव्यात.
प्रशांत काकड, रा. चिकणी, ता. संगमनेर
-----------
७९३