सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मनधरणी
By Admin | Updated: January 15, 2016 23:28 IST2016-01-15T23:25:07+5:302016-01-15T23:28:46+5:30
शेवगाव : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेले नसल्याने चार अपक्ष नगरसेवकांच्या भूमिकेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मनधरणी
शेवगाव : शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बहुमत मिळालेले नसल्याने चार अपक्ष नगरसेवकांच्या भूमिकेस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
शेवगाव शहरात गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराविरोधात शहरवासियांनी दिलेला कौल व शहर विकासाचा सर्वांगिण विचार करून अपक्षांनी भाजपच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी केले आहे.
यासंबंधीच्या निवेदनात शहराध्यक्ष सुरवसे व फुंदे यांनी म्हटले आहे, शेवगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकाळात लोकांना पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आदी मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागल्याने शेवगावची अवस्था एखाद्या भकास खेड्यासारखी झाली आहे. केंद्र व राज्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असूनही शहरात या दुर्दशेला सर्वार्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याने जनतेने आपला रोष मतपेटीतून व्यक्त केलेला आहे.
तसेच आपल्या प्रभागासह शहरात शासनाच्या विविध विकासात्मक योजनांचा थेट लाभ मिळावा, याकरिता अपक्ष नगरसेवकांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन या निवेदनात शहराध्यक्ष सुरवसे व फुंदे यांनी केले आहे. पदाधिकारी निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)