प्रतिष्ठेला मुकलेले श्रमाचे साथीदार
By Admin | Updated: September 22, 2015 00:23 IST2015-09-22T00:08:31+5:302015-09-22T00:23:59+5:30
संदीप रोडे अहमदनगर दुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले.

प्रतिष्ठेला मुकलेले श्रमाचे साथीदार
संदीप रोडे अहमदनगर
दुष्काळाच्या स्थितीत जिरायती शेती नापीक झाली. कुटुंब मोठं असल्याने खायची पंचायत झाली. अशातच मामा भेटले. त्यांनी हमाली कामासाठी नगरला आणले. ४० वर्षापासून हमाली काम करणारे उत्तम जिजाबा हल्लाळ (जामगाव,ता. पारनेर) सांगत होते. शारीरिक कष्टाचे काम केल्याशिवाय पोटाला अन्न मिळत नाही. रोजंदारीवर काम केले तर पोटभर अन्न मिळेल याची शाश्वती नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पण तरीही हमाली काम हीच प्रतिष्ठा मानून ओझे वाहण्याचे काम अविरतपणे सुरू असल्याचे हल्लाळ अभिमानाने सांगत होते. मात्र ओझे वाहणाऱ्या हमालाला समाजात मान सन्मान मिळत नसल्याची खंत हमाल बांधवांच्या बोलण्यातून जाणवली.
श्रमप्रतिष्ठा दिनाच्या पार्श्वभूमीवर हमाली काम करणाऱ्या माथाडी कामगारांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. मुकुंदनगर येथील युसूफ सय्यद पूर्वी दुकानात काम करायचे. दिवसभराची रोजंदारी ६० रुपये. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसे. त्यामुळे ते हमाली कामाकडे वळाले. आडतबाजार, दाळमंडई परिसरात २५५ हमाल पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबराब राबतात. व्यापाऱ्यांचा माल तालुक्याच्या गावातील दुकानात पोहचविण्याची जबाबदारी इमाने इतबारे पार पाडतात. शनिवारी दिवसभरात फक्त २० रुपये मिळाले. असुरक्षित असले तरी हमाली कामच आमची प्रतिष्ठा आहे. युसूफचा मोठा मुलगा बारावी नापास झालाय. त्याला कापडदुकानात कामाला जुंपले. छोटा मुलगा धार्मिक शिक्षण घेतो. धार्मिक क्षेत्रात तो करिअर करणार आहे.
पारनेर या दुष्काळी तालुक्यातील जामगावचे हल्लाळ यांच्या आयुष्यातील कमाईची सुरूवातच हमाली कामातून झाली. तीन भाऊ, तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबाच्या काफिल्यात उत्तमराव वाढत होते. वडील विहीर खोदाईचे काम करत. दुष्काळाच्या स्थितीत जिरायती जमीनही नापीक झाली. त्यामुळे पंचायत झाली. अशातच मामा हरिभाऊ मुंजाळ भेटले. त्यांनी नगरला आणले. तेही हमाली काम करायचे. त्यांनी हमाली कामाला जुंपले. मुलगा चांगला म्हणून मग जावई करून घेतले. हमाली कामातूनच पोटापाण्याची गुजराण सुरू झाली. शेती जिरायती असल्याने गावाकडे जाण्याचा प्रश्नच नव्हता. मुलगा व्यापारी पेढीत दिवाणजीचे काम करतो. वर्षभरापूर्वी मोटारसायकलला झालेल्या अपघातात पाय फ्रॅक्चर झाला. पायात डॉक्टरांनी सळई टाकली. पण अशातही हमाली काम हीच पूजा मानून काम करत असल्याचे सांगताना श्रम हीच प्रतिष्ठा मानतो. त्याशिवाय घरात स्वयंपाक होऊ शकत नाही अशी उद्विवग्नताही त्यांनी व्यक्त केली.