गोदावरी, प्रवरा कालव्यांतून शनिवारपासून आवर्तन
By Admin | Updated: August 19, 2014 23:32 IST2014-08-19T23:24:24+5:302014-08-19T23:32:28+5:30
राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे

गोदावरी, प्रवरा कालव्यांतून शनिवारपासून आवर्तन
राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी नाशिक येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन आवर्तनाची मागणी केली होती. त्यावर दारणा व भंडारदरा धरणातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.
गोदावरी आणि प्रवरा कालव्यातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. विखे यांनी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आवर्तनाबाबत आग्रही भूमिका घेतली होती.
मंगळवारी मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विभागाचे मुख्य अभियंता जी. एस. लोखंडे यांची भेट घेतली.
जलसंपदामंत्री मुश्रीफ, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांच्याशी विखे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी सोडण्याबाबतचा आग्रह धरला.
सर्व स्तरावर झालेल्या चर्चेनंतर मुश्रीफ यांनी २३ आॅगस्ट रोजी गोदावरी समूह, भंडारदरा प्रकल्पातून खरीप आवर्तन सुरू करावे, असे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मुख्य अभियंता लोखंडे व अधीक्षक अभियंता पोकळे यांनी कार्यकारी अभियंता बाफना व कोळी यांना आवर्तनाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शिष्टमंडळात विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, अण्णासाहेब कडू, संचालक शांतीनाथ आहेर, बन्सी तांबे, रमेश मगर, गीताराम तांबे, रघुनाथ बोठे, रावसाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दीपक तुरकणे आदींचा समावेश होता.
(प्रतिनिधी)