प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीला फाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST2021-01-13T04:51:57+5:302021-01-13T04:51:57+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला ...

प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीला फाटा
अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यातील ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७०५ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी दीड हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र, त्यांची कोरोना चाचणी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. लक्षणे असतील त्यांनी चाचणी करून घ्यावी, एवढेच आवाहन प्रशासनाने केले आहे. याशिवाय राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही चाचणी करून घेण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत आहे. असे असले तरी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींसाठी ५ हजार ७९६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी ५१९ अधिकारी आणि १५ हजार १६४ कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीबाबत जिल्हा प्रशासनाने मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हेच अधिकारी, कर्मचारी मतदान यंत्रणा हाताळणार आहेत. तसेच याच सर्व यंत्रणेवर नागरिक मतदान करणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, याकडे मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसते.
----------------
मतदान केंद्रावर कोरोनाचे नियम पाळण्याबाबत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराचे थर्मल स्क्रिनिंग होणार असून सॉनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांनी चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सरसकट चाचण्या केल्या जाणार नाहीत.
- ऊर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल)
--------------------
अशी घेतली जाईल काळजी
प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदान केंद्र सॉनिटाइज होणार आहे. प्रत्येक मतदाराचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. मतदारांनीही लक्षणे असतील तर त्यांनी आधी चाचणी करून घ्यावी. लक्षणे नसतील आणि कोरोना पॉझिटिव्ह मतदार असतील आणि त्यांना क्वारंटाइन केले असेल तर अशांसाठी शेवटच्या अर्ध्या तासात मतदान करण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांना लक्षणे आढळून आल्यास त्यांची तातडीने तपासणी केली जाणार आहे. तसेच लक्षणे असतील तर अतिरिक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय नियमांचे पालन करण्याबाबत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात आले आहेत.
---
डमी- ११ ग्रामपंचायत कोरोना टेस्ट (नेट फोटो)
नेट फोटो- कोरोना
कोरोना स्वॅब