रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:11+5:302021-04-18T04:20:11+5:30
कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत ...

रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी नाही
कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिविर इंजेक्शन हे संजीवनी नाही. त्याच्या वापरातून फक्त फुफ्फुसातील इन्फेक्शन कमी होते. एचआरसीटीचा स्कोर वाढला की, डॉक्टर लगेच रेमडेसिविर लिहून देतात. त्यामुळे नातेवाईक सैरभैर होतात. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविरचा वापर करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
कोपरगाव शहरात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शनिवारी ( दि. १७ ) सकाळी आले होते. यावेळी त्यांनी कोविड सेंटरला भेटी दिल्या. तसेच कृष्णाई मंगल कार्यालयातील बैठकीत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनासाठी आमदारांना १ कोटींचा निधी दिला आहे. त्यातून त्यांनी सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून द्यावे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी बाधित रुग्णांची संख्या कमी करणे महत्त्वाचेे आहे. शिर्डी संस्थानची दोन हॉस्पिटल मिळून सुमारे ४५० बेड्चे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच ते सहा तालुक्यातील नागरिकांना तेथे उपचार घेता येईल. गेल्यावर्षीप्रमाणे गावागावात स्थापन केलेल्या ग्रामसमितीच्या, शहरातील प्रभाग समित्या काम करताना दिसत नाहीत. त्यांनी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेदेखील कोरोनावर नियंत्रण मिळू शकते.
.......
पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष वहाडणेंची री पकडली....
नगराध्यक्ष विजय वहाडणे आपल्या भाषणात म्हणाले, हे संकट सर्वांच्याच दारावर येऊन थांबले आले आहे. त्यामुळे याचे राजकारण न करता एकत्र येत काम करण्याची वेळ आहे. त्यामुळे कुणीही एकामेकांवर टीका टिपण्णी करायची नाही, असे म्हटले. त्यानंतर पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात वहाडणे यांच्या वक्तव्याची री ओढून ही वेळ राजकारण करण्याची नसून सोबत काम करण्याची आहे, असे म्हटले.
........
शिवसैनिकांची नाराजी...
कृष्णाई मंगल कार्यालयात बैठक झाली. पण ज्येष्ठ शिवसैनिकांना माहीत देखील नाही. म्हणायला सरकार आमचे आहे. पण शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही. या अगोदर युती सरकार होते. कोपरगाव भाजपने पूरेपूर फायदा करून घेतला आणि आता आघाडी सरकारचा फायदा राष्ट्रवादी घेत आहे. सरकार कोणाचेही असो अधिकाऱ्यांना फक्त काळे-कोल्हेच माहीत आहेत. आम्हा शिवसैनिकांना कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. तालुक्यात पक्ष जिवंत ठेवण्यात बऱ्याच शिवसैनिकांचे योगदान आहे. पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इमेल केला असून लॉकडाऊन उठल्यानंतर भेट घेऊन विषय त्यांच्या कानावर घालणार असल्याचे म्हणत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
............
१७हसन मुश्रीफ