दहावीच्या दाखल्यावरील शेरा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:14+5:302021-07-27T04:22:14+5:30
अहमदनगर : कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. यंदा पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यात दहावीची ...

दहावीच्या दाखल्यावरील शेरा बदलणार
अहमदनगर : कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. यंदा पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यात दहावीची परीक्षा रद्द होऊन अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र दहावीतून उत्तीर्ण झाल्यानंतर दाखले तयार करण्यात मुख्याध्यापकांना अडचणी येत होत्या. कारण परीक्षाच न झाल्यामुळे दाखल्यावर तारीख, महिना किंवा शेरा काय द्यायचा, हा प्रश्न होता. दरम्यान, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार यंदा दाखल्यावर परीक्षेच्या महिन्याचा उल्लेख न करता केवळ एसएससी उत्तीर्ण असा शेरा राहणार आहे.
दहावीचा निकाल १६ जुलैला ॲानलाईन जाहीर झाला. नगर जिल्ह्यातून दहावीसाठी ७० हजार ५८५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ४० हजार ५४२ मुले, तर ३००२४ मुली उत्तीर्ण झाल्या. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होते. त्यासाठी दहावीतील दाखला काढण्यासाठी विद्यार्थी शाळा गाठतात. दरवर्षी दाखला देताना मुख्याध्यापक दाखल्यावर शेरा देताना दहावीची परीक्षा दिलेल्या महिन्याचा उल्लेख करून उत्तीर्ण असा उल्लेख करतात. परंतु यंदा परीक्षाच न झाल्याने दाखल्यावर काय उल्लेख करायचा, या संभ्रमात मुख्याध्यापक होते. परंतु माध्यमिक शिक्षण विभागाने यात शाळांना कळवून ‘एसएससी परीक्षा २०२१ उत्तीर्ण’ असा शेरा देण्यास सांगितले आहे.
-----------
जिल्ह्यातील माध्य. व उच्च माध्य. शाळा - १३०१
दहावीतील एकूण विद्यार्थी - ७०५८५
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी - ७०५६६
मुले - ४०५४२
मुली - ३००२४
--------------
मुख्याध्यापक म्हणतात...
दरवर्षी दहावी उत्तीर्णनंतर शाळा सोडल्याच्या दाखल्यावर दहावी परीक्षा दिल्याचा महिना व वर्ष याचा उल्लेख करून उत्तीर्ण असा उल्लेख केला जायचा. परंतु यंदा परीक्षाच न झाल्याने तारीख वगळता केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण असा शेरा दिला जाणार आहे.
- सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघटना
----------------
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे यंदा दहावी विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर केवळ दहावी परीक्षा उत्तीर्ण असा शेरा दिला जाईल. अजून बोर्डाच्या गुणपत्रिका आलेल्या नाहीत. त्या आल्या की गुणपत्रिका व दाखले दिले जातील.
- दत्तात्रय गुंड, मुख्याध्यापक, काकासाहेब म्हस्के विद्यालय, मांडवे
--------------
पालक म्हणतात...
दहावीचा निकाल लागून दहा दिवस झाले, मात्र अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्या लवकर मिळाव्यात, तसेच दाखल्यांबाबतही मुख्याध्यापकांनी त्वरित निर्णय घ्यावा.
- गजानन सुंबे, पालक
---------------
यंदा दहावीचा निकाल लागला असला तरी, अकरावी प्रवेशासाठी सीईटी होणार आहे. त्यामुळे अजून महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे दाखला काढण्याची घाई नाही. परंतु शाळेने दाखले देण्याबाबत तयारी करावी.
- अरुण साबळे, पालक
------------
दरवर्षी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर महिना व वर्ष असा उल्लेख करून दाखला दिला जायचा. परंतु यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे यावेळी दाखल्यावर परीक्षा महिन्याचा उल्लेख न करता केवळ दहावी उत्तीर्ण असा उल्लेख करण्याबाबत निर्णय होऊन तसे शाळांना कळविले आहे.
- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग