जिल्ह्यातील दहावीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:05+5:302021-04-22T04:21:05+5:30

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा ...

Relief for 73,000 10th standard students in the district | जिल्ह्यातील दहावीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

जिल्ह्यातील दहावीच्या ७३ हजार विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यासह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता सर्वांत प्रथम सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर लागलीच आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंडळांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने गुणांचे समानीकरण या मुद्द्यावर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेतला, तर बारावीची परीक्षा होणार असून, ती पुढे ढकलण्यात आली आहे.

यापूर्वी राज्य सरकारने पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे केवळ दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या परीक्षाबाबतचा निर्णय प्रलंबित होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दहावीची परीक्षा रद्द होणार असली तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे. ते कोणत्या आधारे आणि कोणत्या निकषावर करायचे याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण विभाग येत्या काही दिवसांत देईल. मात्र, या अंतर्गत मूल्यमापनातून कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, याची काळजी शासन घेणार असल्याचे समजते. ज्या विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे, त्यांनाही वेगळी संधी दिली जाईल, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातून दहावीसाठी एकूण ७० हजार १३९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात ४२ हजार ५९७ विद्यार्थी, तर ३० हजार ५३४ विद्यार्थिनींचा समावेश होता. २९ एप्रिलपासून या विद्यार्थ्यांची परीक्षाही सुरू होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जूनपासून शाळा बंद होत्या. नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, त्यालाही फारशी उपस्थिती नव्हती. बहुतांश अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवला गेला. ग्रामीण भागात मात्र तंत्रज्ञानाची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत होती. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

--------------

परीक्षा शुल्काचा प्रश्न

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क शासन पुन्हा माघारी देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना विचारले असता शासन यावर धोरण जाहीर करेल, असे ते म्हणाले.

--------------

जिल्ह्यातून दहावीला प्रविष्ट झालेले विद्यार्थी

विद्यार्थी- ४२,५९७

विद्यार्थिनी- ३०,५३४

एकूण- ७३,१३९

Web Title: Relief for 73,000 10th standard students in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.