बोठे अन् आरोपींचा संबंध न्यायालयात झाला उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:45 IST2020-12-17T04:45:41+5:302020-12-17T04:45:41+5:30

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे आणि अटकेत असलेल्या आरोपींचा ...

The relationship between the two accused was revealed in the court | बोठे अन् आरोपींचा संबंध न्यायालयात झाला उघड

बोठे अन् आरोपींचा संबंध न्यायालयात झाला उघड

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे आणि अटकेत असलेल्या आरोपींचा थेट संबंध असल्याची बाब सुनावणीदरम्यान न्यायालयात समोर आली. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने बोठे याचा बुधवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर शहरातून पसार झालेल्या बोठे याने जिल्हा न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी ७ डिसेंबर रोजी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमारे या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. सतीश पाटील यांनी युक्तिवाद करत बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याने त्याला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी केली होती. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. बुधवारी न्यायालयाने निर्णय देत बोठे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याला आता जामिनासाठी खंडपीठात धाव घ्यावी लागणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. बोठे मात्र अद्याप पोलिसांना सापडेना, हे विशेष.

या कारणांमुळे नाकारला बोठे याचा जामीन

जरे यांची हत्या होण्याच्या एक महिना आधीपासून बाळ बोठे हा अटकेत असलेले आरोपी आणि मयत जरे यांच्या संपर्कात असल्याचे पाेलिसांनी तपासलेल्या सीडीआरमधून समोर आले आहे.

गुन्ह्याच्या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधील हालचाल आणि साक्षीदारांनी दिलेल्या जबाबावरून बोठे आणि आरोपी यांचा गुन्ह्याशी संबंध दिसून येतो.

गुन्ह्यात अटक आरोपींकडून जप्त केलेले ६ लाख २० हजार रुपये हा बोठे याच्या विराधोतील प्रथमदर्शनी पुरावा दिसून येतो. तसेच ही घटना गंभीर स्वरूपाची असून, गळा चिरून हत्या झालेली आहे. आदी कारणांचा उल्लेख करत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

------------------------------------------------------------------------------

बोठेचा आयफोन होईना ओपन

बोठे याच्या बंगल्याची झडती घेत असताना पोलिसांनी त्याचा मोबाइल जप्त केला आहे. हा जप्त केलेला मोबाइल आयफोन आहे. त्याचा पासवर्ड बोठे यालाच माहीत आहे. या मोबाइलमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळू शकते. मात्र, आयफोनचा पासवर्ड क्रॅक करणे अवघड बाब असल्याने बोठेच्या अटकेनंतरच हा मोबाइलही ओपन होऊ शकतो.

Web Title: The relationship between the two accused was revealed in the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.