रेखा जरे हत्याकांडातील मारेकरी गजाआड
By | Updated: December 5, 2020 04:34 IST2020-12-05T04:34:39+5:302020-12-05T04:34:39+5:30
ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (रा. राहुरी) आणि आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार ता. राहाता) ...

रेखा जरे हत्याकांडातील मारेकरी गजाआड
ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (रा. श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (रा. राहुरी) आणि आदित्य सुधाकर चोळके (रा. कोल्हार ता. राहाता) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. केडगाव (ता. नगर) येथील चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते. याशिवाय मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
रेखा जरे (वय ३०) या सोमवारी पुणे येथून आई, मुलगा आणि प्रशासकीय अधिकारी विजयामाला माने यांच्यासमवेत कारमधून नगरच्या दिशेन येत होत्या. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा परिसरात रात्री पावणेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून हत्या केली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित २४ तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली तर, चौथा आरोपी ताब्यात घेतला. ज्ञानेश्वर आणि फिरोज या दोन आरोपींनी शिरूरपासून जरे यांच्या कारचा पाठलाग केला. जातेगाव फाटा परिसरात कार अडवून एकजण कारसमारे उभा राहिला आणि दुसऱ्याने त्यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर हे दोघे घटनास्थळावरून पसार झाले, अशी माहिती पुढे आली आहे.
............
कट रचून झाले हत्याकांड
जरे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आली, असा तपशील पुढे येत आहे. हत्येचा कट कोणी रचला आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली? यासंदर्भातील माहिती पोलिसांनी उघड केलेली नाही. मुख्य सूत्रधार हा नगर शहरातील असून त्याने केडगाव येथील आरोपीला हत्याकांडाची सुपारी दिली. त्यानंतर केडगावच्या आरोपीने इतर तीन आरोपींच्या मदतीने ही हत्या घडवून आणली असे सूत्रांचे म्हणणे आहे. नगरमधील मुख्य सूत्रधाराच्या नावापर्यंत पोलीस पोहोचले असल्याचीही माहिती आहे.
.......................................................
फोटोवरून लागला सुगावा
जरे यांची कार अडविली तेव्हा एक आरोपी हा त्यांच्या कारसमोर उभा होता. याचवेळी जरे यांच्या मुलाने मोबाईलमधून त्याचा फोटा काढला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच फोटोच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला तेव्हा तीन आरोपी कोल्हार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री तिघांना अटक केली.