रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे यास 7 दिवसांची पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 14:52 IST2021-03-14T14:07:52+5:302021-03-14T14:52:51+5:30

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने 7  दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Rekha Jare murder: Accused Bal Bathe remanded in police custody for 8 days | रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे यास 7 दिवसांची पोलीस कोठडी 

रेखा जरे हत्याकांड : आरोपी बाळ बोठे यास 7 दिवसांची पोलीस कोठडी 

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ जगन्नाथ बोठे याला पारनेर न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २० मार्चपऱ्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अडीच महिन्यांनी नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. हत्येच्या घटनेवेळी बाळ बोठे हा सकाळ वृत्तपत्राचा नगरचा कार्यकारी संपादक होता. 

 

पोलिसांना बोठे यास पारनेर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता. त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या त्याने का केली, याचा उलगडा अजून व्हायचा आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी केली. 

 

 

बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी फरार आहे.

 

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट (ता. पारनेर) परिसरात गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. जरे यांच्या हत्येची सुपारी देणारा बोठे मात्र फरार झाला होता. बोठे हा हैदराबाद येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहा पोलीस पथकांनी पाच दिवस हैदराबाद येथील बिलालनगर परिसरात शोध घेऊन बोठे याच्यासह त्याला मदत करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले.

Web Title: Rekha Jare murder: Accused Bal Bathe remanded in police custody for 8 days