कोरोनाकाळात बेवारस फिरणाऱ्या महिलेचे कुटुंबात पुन्हा पुनर्वसन
By अरुण वाघमोडे | Updated: November 24, 2023 15:38 IST2023-11-24T15:37:23+5:302023-11-24T15:38:11+5:30
मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले.

कोरोनाकाळात बेवारस फिरणाऱ्या महिलेचे कुटुंबात पुन्हा पुनर्वसन
अरुण वाघमोडे, अहमदनगर: रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करणाऱ्या आरणगाव (ता. नगर) येथील मानवसेवा प्रकल्पातून आणखी एका महिलेला आधार देत तिला सुखरुप तिच्या घरी पाठविण्यात आले आहे.
मानसिक विकलांगतेमुळे भान हरवलेली सबेरा (नाव बदलेले आहे) कोरोना काळात टाळेबंदीमध्ये रस्त्यावर फिरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला शहरातील एका संस्थेत दाखल केले होते.या संस्थेमार्फत पुढील उपचार व पुनर्वसनासाठी तिला २९ डिसेंबर २०२१ रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले. मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले. संस्थेच्या अध्यक्षा पूजा मुठे यांनी महिलेचे समुपदेशन करत तिच्या कुटुंबियांविषयी माहिती घेतली. त्यानंतर संस्थेचे कार्यकर्ते अंबादास गुंजाळ यांनी थेट सबेराच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. सबेरा या महिलेची मुलगी व जावई २१ नोव्हेंबर रोजी अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात येऊन तिला घेऊन गेले. याप्रसंगी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षा पूजा मुठे, उपाध्यक्षा शारदा होशिंग, मार्गदर्शक महेश पवार यांनी सबेराला साडीचोळी देऊन सन्मानाने तिला कुटुंबियांच्या ताब्यात दिले.