अहमदनगर : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटी पथकामार्फत करण्यात यावा, अशी मागणी अंनिसचे कार्यकर्ते करीत होते़ मात्र, शुक्रवारी (दि़९) न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिल्यानंतर हा तपास एसआयटीमार्फतच व्हायला पाहिजे होता, अशी खंत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली़ नगर येथे आयोजित पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, दाभोलकर यांची हत्या होऊन ८ महिने झाले आहेत़ या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक होणे गरजेचे होते़ मात्र, या घटनेचा तपास अद्याप लागू शकला नाही़ ही घटना पुण्यात घडल्याने स्थानिक पोलीस व राज्य सरकारने आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची अपेक्षा होती़ मात्र, आठ महिने उलटले तरी या घटनेचा तपास लागत नाही़ त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत़ या घटनेचा तपास एसआयटीमार्फत व्हावा, अशी आमची मागणी होती़ त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेतली होती़ त्यांनी एसआयटीमार्फत तपास करण्यासाठी अनुकूलता दाखविली़ मात्र, पुढे काहीही कार्यवाही केली नाही़ एसआयटी ही न्यायालयाला जबाबदेही असते़ त्यामुळे या प्रकरणाचा तपास लवकर व नि:पक्षपाती होईल, अशी अपेक्षा होती, असे पाटील म्हणाले़ दरम्यान, मुंबईतील एका कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल करून दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी केली होती़ या याचिकेवर सुनावणी होऊन दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे़ सीबीआय तपासाला आमचा विरोध नाही़ मात्र, हा तपास स्थानिक पोलिसांनी लावणे आवश्यक होते़ तो त्यांनी केला नाही़ आता सीबीआयने तात्काळ तपास लावावा, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)
एसआयटीकडे तपास न दिल्याची खंत
By admin | Updated: June 15, 2023 12:29 IST