विश्वस्त मंडळ बरखास्तीची शिफारस
By Admin | Updated: June 3, 2014 00:26 IST2014-06-02T23:28:12+5:302014-06-03T00:26:19+5:30
अहमदनगर : श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आहे.
विश्वस्त मंडळ बरखास्तीची शिफारस
अहमदनगर : श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्तांमध्ये एकमेकांबद्दल अविश्वासाचे वातावरण आहे. या विश्वस्त मंडळात माध्यमिक शिक्षक, पत्रकार, वकील, उद्योजक, डॉक्टर, प्राध्यापक असून अंतर्गत कलह व राजकारणामुळे त्यांच्यात वाद सुरू आहेत. ते देवस्थानसाठी योग्य नाही. विश्वस्तांची वर्तवणूक पाहता व देवस्थानचे हित पाहता विद्यमान विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन मंडळ नेमणे योग्य वाटते, असा अभिप्राय धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या निरीक्षकांनी सादर केल्याने खळबळ उडाली आहे. देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये एकमेकांविरूध्द तक्रारी, मिटींगमध्ये वाद, पिस्तुलने एकमेकांना धमकावणे, धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता खर्च करणे, झालेल्या ठरावात बदल करणे, खोट्या सह्यांच्या आधारे रेकॉर्ड तयार करणे, मनाप्रमाणे ठराव करून घेणे, प्रासेडिंग पळविणे व त्यावर शेरे मारणे, विश्वस्तांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी देणे, कर्मचार्यांना धमकावणे, देवस्थानच्या रुग्णवाहिकेचा स्वत:साठी वापर करणे, त्याच रुग्णवाहीकेवर तीन महिन्यांत ३५ हजार ६८८ रुपये खर्च करणे, ठराव नसताना देवस्थानची जमीन ३० वर्षे भाडेपट्टी कराराने देणे आदी, तक्रारी होत्या. या तक्रारी संदर्भात चौकशीसाठी नगरचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त डोंगरे यांनी कार्यालयीन निरीक्षक सुरकुटला, आंधळे, अवचट यांनी निरीक्षक म्हणून पाठवत सर्व माहिती घेतली. या निरीक्षकांनी सविस्तर अहवाल तयार करून विद्यमान विश्वस्त बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, निरीक्षकांच्या अहवालानंतर धर्मादाय आयुक्तांनी आदेश काढत विश्वस्त मंडळाला नोटीस काढली आहे. यात देवस्थानच्या हितासाठी सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचा अहवाल धर्मादाय विभाग पुणे यांच्याकडे का पाठविण्यात येऊन याबाबत येत्या ७ जून पर्यंत खुलासा विचारण्यात आलेला आहे. त्या खुलाशावर ११ जूनला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.