छतावरच्या पाण्याने विहिरीचे पुनर्भरण
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:22:35+5:302014-07-27T01:08:42+5:30
अहमदनगर : घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी अतिशय कमी खर्चात गोळा करून त्याद्वारे शेजाऱ्याच्या जमिनीतील विहिरीचे पुनर्भरण करून एका शिक्षकाने पाणी बचतीचा वस्तुपाठच घालून दिला आहे.
छतावरच्या पाण्याने विहिरीचे पुनर्भरण
अहमदनगर : घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी अतिशय कमी खर्चात गोळा करून त्याद्वारे शेजाऱ्याच्या जमिनीतील विहिरीचे पुनर्भरण करून एका शिक्षकाने पाणी बचतीचा वस्तुपाठच घालून दिला आहे. ‘रेन हार्वेस्टिंग’ हे केवळ फळ््यावर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून साकारले आहे. फुलसौंदर मळा येथे राहणारे आणि भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे शिक्षक सतीशकुमार गुगळे असे या शिक्षकाचे नाव आहे.
घराच्या छतावरील पाणी साठविले पाहिजे, असा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यासाठी कोणती शासकीय योजना आहे, यापेक्षा स्वखर्चाने विहिरीचे पुनर्भरण करता येईल का याचा त्यांनी अभ्यास केला. रेन हार्वेस्टिंग करायचे तर स्वत:कडे कुपनलिका नाही. शोष खड्ड्यात पाणी सोडले तर त्याचा पुनर्वापर दिसणारा नाही. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या घरापासून साधारण शंभर फूट अंतरावर असलेल्या शेतविहिरीपर्यंत अडीच इंच पीव्हीसी पाईपद्वारे हे पाणी वाहून आणले. त्यासाठी ३ हजार ४०० रुपये खर्च झाला. पाऊस आल्यामुळे या विहिरीत पाणी साठले आहे. स्वयंपाक घरातील सिंक, वॉश बेसीन, स्नानगृह यांचे पाणी देखील ड्रेनेजलाईनला न जोडता शोष खड्ड्यात सोडण्यात आले आहे, असे गुगळे म्हणाले.
‘इनोव्हेटिव्ह इको फ्रेंडली बांबू हाऊस’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगळे यांच्या दुमजली वास्तुत संपूर्ण आरसीसी बांधकामात बांबुचा वापर केला आहे. तापमान नियंत्रणासाठी कॅव्हिटी वॉल, घनकचऱ्याचे-ओल्या कचऱ्याचे विघटन करून सेप्टीक टँकऐवजी बायोगॅसची निर्मिती, नैसर्गिक पीओपीसाठी दिवाळीतील पणत्यांचा वापर, नैसर्गिक हवा, प्रकाशासाठी दरवाजे-खिडक्यांची योग्य रचना, सौर उर्जेचा वापर त्यांनी केला आहे. या पर्यावरण पूरक घरासाठी त्यांच्या वास्तुला २०१३ मध्ये बेस्ट स्ट्रक्चर अॅवार्डही मिळाला होता. (प्रतिनिधी)