अतिवृष्टीचे दुसऱ्या टप्प्यातील साडेचार कोटींचे अनुदान प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:38+5:302021-02-06T04:36:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : तालुक्यात मागील वर्षी खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे ...

अतिवृष्टीचे दुसऱ्या टप्प्यातील साडेचार कोटींचे अनुदान प्राप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यात मागील वर्षी खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले होते. त्याची दुसऱ्या टप्यातील नुकसानभरपाईची ४ कोटी ६५ लाख ५६ हजार इतकी रक्कम तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या ७ हजार २०७ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील ७९ गावात मागील वर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला. त्यात वादळीवारे, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, कपाशी, मूग, कांदा, कांदा रोपे, भुईमूग, वांगे, घास, टमाटा, कडवळ, तूर मिरची, फ्लॉवर, डांगर या पिकांचे दहा हजार हेक्टर क्षेत्राचे तसेच डाळिंब, पेरू, सीताफळ, बोर या फळपिकांचे २५ हजार हेक्टरवर नुकसान झाले होते. या सर्व पिकांच्या नुकसानीचा महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात आला होता. यात सुमारे ५८ गावांतील १४ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी सुमारे ९ कोटी ६६ लाख ४३ हजार ७८० रुपये इतक्या रक्कमेचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविला होता. त्यापोटी मागील वर्षी दिवाळी दरम्यान पहिल्या टप्यात नुकसानभरपाईची सुमारे साडेचार कोटींची रक्कम देण्यात आली होती. ती रक्कम सात हजारांच्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली होती. उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील ४ कोटी ६५ लाख ५६ हजार इतकी रक्कम नुकतीच तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. ही रक्कम तहसील कार्यालयामार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटींच्यावर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असून, उर्वरित रक्कम ही सामूहिक क्षेत्र असलेल्या खातेधारक शेतकऱ्यांना प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागणार आहे. तसेच बँकेचा खाते नंबर न दिलेल्या शेतकऱ्यांनीदेखील आपला खाते नंबर तहसील कार्यलयात देणे आवश्यक असणार आहे.
.........
या अनुदानापोटी बरीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. परंतु, काही शेतकऱ्यांचे उताऱ्यावर एकापेक्षा जास्त नावे आहेत. अशा शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील कोणा एका व्यक्तीच्या नावावर रक्कम जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून कार्यालयात जमा करावे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपल्या बँकेचा खातेनंबर दिलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तत्काळ नंबर द्यावे त्यांच्या खात्यावर तत्काळ रक्कम जमा करण्यात येईल.
- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव