वाळू मुळाची अन पावती गोदावरीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:36+5:302021-06-02T04:17:36+5:30
सोमवारी (३१ मे) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर कुरकुंडी शिवारात अवैधरीत्या गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर नायब ...

वाळू मुळाची अन पावती गोदावरीची?
सोमवारी (३१ मे) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर कुरकुंडी शिवारात अवैधरीत्या गौण खनिजाची विनापरवाना वाहतूक करणारा डंपर नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी ताब्यात घेतला. चालक गणेश आवटे याला त्यांनी विचारणा केली असता डंपर मौजे पुणतांबा ता. श्रीरामपूर येथून वाळूच्या ठेक्यात भरला असून वाहतूक परवाना मालक समीर शेख (रा. आळेफाटा, जुन्नर पुणे) याच्याकडे असल्याचे चालकाने सांगितले. नायब तहसीलदार कडनोर यांनी पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत वाहन घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे ताबा पावतीत म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित वाहन तालुक्यातील नांदूर खंदरमाळ परिसरातून अवैध वाळू घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना महसूलने कुरकुंडी शिवारात ताब्यात घेतले. पोलिसांच्या ताब्यात देताना ताबापावती करतेवेळी वाहन नंबर टाकणे टाळण्यात आले. ताबापावतीत चालकाने मौजे पुणतांबा ता. श्रीरामपूर येथील ठेक्यातून वाळू भरत असल्याचे सांगितले. मात्र, पुणतांबा राहाता तालुक्यात आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी (मातुलठाण) येथे लिलाव सुरू असून चालकाला साधे वाळू ठेक्याचे नावसुद्धा सांगता आले नसल्याने मुळा नदी परिसरात सुरू असलेली अवैध वाळूची वाहतूक श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या वाळू ठेक्याच्या पावत्या दाखवून अधिकृत होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
..............
पावत्या उपलब्ध करण्यासाठी वेळ दिला का...?
संबंधित डंपर वाळू लिलावात भरला असेल तर वाहनचालकाकडे पावती असणे अपेक्षित होते. डंपर घारगाव पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आल्यानंतर डंपर मालकाने डंपर सोडण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याने महसूल अधिकाऱ्यांना पावत्या सादर केल्या नाहीत. मंगळवारी सायंकाळपर्यंत महसूलकडून संबंधित डंपरवर कोणतीही कारवाई झाली नाही. पावत्या उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने संबंधिताला वेळ दिला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
.............
नाशिक-पुणे महामार्गावर कुरकुंडी शिवारात अवैध वाळूची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेऊन घारगाव पोलीस आवारात लावण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू असून कागदपत्रांच्या आधारे नियमानुसार कारवाई केली जाईल.
- उमाकांत कडनोर, नायब तहसीलदार, संगमनेर