‘श्रीगोंद्या’साठी रासप आक्रमक
By Admin | Updated: August 20, 2014 23:27 IST2014-08-20T23:15:12+5:302014-08-20T23:27:35+5:30
श्रीगोंदा : महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.

‘श्रीगोंद्या’साठी रासप आक्रमक
श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. राज्यात एखाद्या जागेवर तडजोड करण्याची भूमिका घेऊ. मात्र श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.
श्रीगोंदा येथे रासपचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात जानकर बोलत होते. जानकर पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे माझ्या भगिनी असून, बाळासाहेब नाहाटा माझे बंधू आहेत. तुम्ही नाहाटांना मदत करा, त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवावर साम्राज्य उभ्या करणाऱ्या पाचपुते-नागवडेंनी कुकडी घोडचा पाणी प्रश्न सोडविला का? त्यांनाच किती दिवस आमदारकीची संधी द्यावयाची. आता सामान्य बहुजन दिनदलित झोपडीतील माणसाच्या हाती सत्ता देण्याची वेळ आली आहे. गोपीनाथ मुंडेंमुळे माझी उंची वाढली आहे. राज्यात गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे महायुतीचे सरकार आणायचे आहे. महायुतीची साखळी भक्कम आहे. ही साखळी तुटणार कधीही नाही. जागा वाटपाबाबत मी राजू शेट्टी, विनायक मेटे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांची भेट घेणार आहोत. मला आमदार व्हायचे नाही. मी केंद्रात जाणार आहे. केंद्रात राज्य आमचे आहे. माझ्या सहकारी नेत्यावर खोट्या केसेस करण्याच्या फंदात पडू नये, असे जानकर म्हणाले.
बाळासाहेब नाहाटा म्हणाले, लहान माणसांनी विस्थापितांचे नेतृत्व पुढे आणले, परंतु विस्थापित नेतृत्व प्रस्थापित झाले. लहान माणसाचा त्यांना विसर पडला. आता सत्तेसाठी ते पुन्हा उड्या मारीत आहेत. विधानसभची निवडणूक लागली की घोड व विसापूर धरणाची उंची वाढविण्याची घोषणा, काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली की, अकलुज माळीनगर करण्याचे स्वप्न दाखविले जाते. कुकडीचे आवर्तन दिले नाही. नगर-दौंड रस्त्याचा प्रश्न पवारांच्या अंगावर ढकलून दिला आहे, अशी जोरदार टीका नाहाटा यांनी केली़
यावेळी दशरथ चव्हाण, गुलाब रासकर, नंदकुमार ताडे, कांतीलाल कोकाटे यांची भाषणे झाली. याप्रसंगी माजी आमदार कुमार पाटील, विजय मोरे, बाळासाहेब महाडिक, भाऊसाहेब गोरे, संजय जामदार, नितीन पठारे आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)