राशीन : राशीन (ता.कर्जत) येथील जगदंबा (येमाई) मंदिरात रविवारी (दि.२९) मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीवत पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मुक्त गुलाल व कुंकवाची उधळण व देवीचा जयघोष करीत गावोगावच्या तरूण भाविकांनी वाजत-गाजत मशाली प्रज्ज्वलित करून प्रस्थान ठेवले. यामुळे मंदिर परिसर दणाणून गेला होता. रविवारी सकाळी ११ वाजता आखोबा स्वामी शेटे यांचे सातवे वंशज अमोल शेटे व गुरव पुजारी श्रीकांत रेणूकर यांच्या हस्ते देवीच्या महाभिषेकानंतर घटस्थापना झाली. यानंतर घरोघरी नऊ दिवसांच्या धार्मिक उपासना पर्वाला सुरूवात झाली.यावेळी शिवदास शेटे, शरदचंद्र शेटे, महेश शेटे, उमेश शेटे, नितीन शेटे, जितेंद्र शेटे, योगेश शेटे, ज्ञानेश्वर रेणूकर, विक्रम रेणूकर, सुनील रेणूकर, अॅड. सचिन रेणूकर, गणेश रेणूकर, विकास वाघमारे, शुभम रेणूकर, मनोज मदवे, तुकाराम सागडे, विजय मोढळे, अॅड. युवराज राजेभोसले आदींसह भाविक उपस्थित होते. पौरोहित्य संदीप सागडे यांनी केले.मांसाहार, केशकर्तनाची दुकाने बंद..राशीन देवीच्या यात्रेला सर्वधर्मीय भाविक एकत्र येतात. नवरात्राच्या काळात संपूर्ण दहा दिवस मांसाहार वर्ज्य असतो. या काळात मांस विक्रेत्यांची दुकानेही बंद असतात. त्याचप्रमाणे नाभिक समाज केशकर्तनाची दुकाने दहा दिवस बंद ठेवतात. राशीनसह परिसरातील भाविकांकडून पलंग, गादी व पादत्राणांचा (चप्पल) वापर बंद असतो. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथील मुस्लिम समाजातील अनेक मंडळी देवीचा नऊ दिवसाचा उपवास करतात.
राशीनला जगदंबा मातेचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 15:39 IST