संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात रॅपिड ॲंटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:06+5:302021-05-18T04:21:06+5:30
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वी दंडात्मक ...

संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात रॅपिड ॲंटिजन चाचणी
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पूर्वी दंडात्मक कारवाई केली जायची. त्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रस्त्यांवर विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्यांची नागरिकांवर दंडाच्या कारवाई व्यतिरिक्त वैद्यकीय पथकामार्फत कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास शासकीय कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येते आहे. साेमवारी विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्या शंभर नागरिकांची रॅपिड ॲंटिजन चाचणी करण्यात आली. त्यात चार जण पॉझिटिव्ह आढळून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू होती. पोलीस, महसूल व नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यात सहभागी झाले होते.
------------
अनेकांनी धूम ठोकली, काहींनी मार्ग बदलला
नवीन नगर रस्ता, शहरातून जाणारा नाशिक-पुणे महामार्ग येथे विनाकारण, विनापरवाना फिरणाऱ्यांना पोलीस पकडत होते. दुचाकीहून डबल सीट जाणाऱ्यांनादेखील पकडण्यात आले. त्यावेळी अनेकांनी पोलिसांना पाहून धूम ठोकली, तर काहींनी मार्ग बदलला. पकडलेल्यांची संगमनेर बसस्थानकाच्या परिसरात रॅपिड ॲंटिजन चाचणी करण्यात येत होती. पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना रुग्णवाहिकेत बसविण्यात येत होते. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या अनेकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला.