नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये रंगला विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:17+5:302021-06-09T04:27:17+5:30
पारनेर (अहमदनगर) : आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात (कोविड उपचार ...

नीलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये रंगला विवाह सोहळा
पारनेर (अहमदनगर) : आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेल्या भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात (कोविड उपचार केंद्र) रविवारी दोन उच्चशिक्षित जोडप्याचा विवाह सोहळा झाला.
कोरोना संसर्गाविषयी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. कोरोनाबाधित तसेच करोनामुक्त व्यक्तींकडे, त्यांच्या कुटुंबीयांकडे तुच्छतेने पाहिले जाते. त्यामुळे अशा कुटुंबांना मानसिक, सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी, कोरोना संसर्गाविषयी असणारी अनाठायी भीती, गैरसमज दूर करण्यासाठी कोरोना उपचार केंद्रात विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतला असल्याचे निकेत व्यवहारे व आरती शिंदे तसेच जनार्दन कदम व राजश्री काळे या उच्चशिक्षित वधू-वरांनी सांगितले.
यावेळी आमदार नीलेश लंके, वकील राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, श्रीकांत चौरे, डॉ. सुनील गंधे, बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, संदीप भागवत, संदीप चौधरी, देवराम व्यवहारे, सुदाम शिंदे, रामभाऊ रासकर, लहू व्यवहारे, रावसाहेब काळे, आदिनाथ काळे, जगदीश काळे, लहू व्यवहारे, रमेश व्यवहारे आदी उपस्थित होते.
---
असा झाला विवाह सोहळा..
वधू-वरांसह उपस्थितांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्या. विवाहस्थळाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर वधू-वरांसह वऱ्हाडींना विवाह मंडपात, व्यासपीठावर प्रवेश देण्यात आला. विवाह समारंभातील अनेक अनिष्ट रुढी-परंपरांना फाटा देण्यात आला. रुखवतामध्ये वधू-वरांनी कोविड उपचार केंद्राला भेट दिलेले जंतुनाशकांचे डबे, मास्क, पीपीई कीट, औषधांची खोकी ठेवण्यात आली. साधेपणाने विवाह सोहळा पार पाडल्याने वाचलेली रक्कम कोविड उपचार केंद्राला मदत म्हणून देण्यात आली.
--
वधू-वरांच्या मित्रांनी उपचार केंद्रात विवाह सोहळा करण्याची परवानगी मागितली. त्यावेळी मला आश्चर्य वाटले. द्विधा मन:स्थिती निर्माण झाली. कोरोनाबाबतचे गैरसमज दूर करायचे असतील तर असे निर्णय घ्यावे लागतील, असा कौल माझ्या मनाने दिला व विवाह सोहळ्यास परवानगी दिली.
-नीलेश लंके,
सदस्य, पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघ
----
०७ नीलेश लंके
भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये रविवारी दोन जोडप्यांचा विवाह झाला. यावेळी नवदाम्पत्यांसह आमदार नीलेश लंके व इतर.