कोकमठाण येथे राम नाम जप सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:18+5:302021-02-05T06:40:18+5:30
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा ऊर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांचा ३१ वा पुण्यतिथी सोहळा कोरोना संसर्ग ...

कोकमठाण येथे राम नाम जप सप्ताह
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील ब्रह्मलीन संत रामदासीबाबा ऊर्फ शंकर हरिभाऊ कोल्हटकर यांचा ३१ वा पुण्यतिथी सोहळा कोरोना संसर्ग सर्व नियम पाळून ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने अखंड राम नाम जप सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात रामदासी बाबा भक्त मंडळ सदस्यांच्या हस्ते शनिवारी (दि. ३०) करण्यात आली. गेल्यावर्षी नवरात्र उत्सव सोहळ्याच्या प्रारंभी रामदासी बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून ९० दिवस राम नाम जप संकल्प करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्र राज्यभरातून तसेच देश-विदेशातील भक्त मंडळींनी साथ देत रामनाम जप सुरू केला.
या पुण्यतिथी सप्ताह काळात दररोज पहाटे चार ते पाच काकड आरती, सकाळी ८ ते ११ या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण, तर ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कोकमठाण गावातून रामदासी बाबा यांच्या प्रतिमेची मिरवणूक, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता शोभादेवी व शरद रावसाहेब थोरात यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तसेच सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने रामदासी बाबा पुण्यतिथी व अखंड रामनाम जप सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी राम नाम जप सप्ताहात सहभाग घेऊन संकल्पपूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन रामदासीबाबा भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
..........
फोटो३०- ब्रह्मलीन रामदासी बाबा - कोपरगाव.