राजळेंचा उद्या भाजपाप्रवेश!
By Admin | Updated: September 23, 2014 23:03 IST2014-09-23T23:00:32+5:302014-09-23T23:03:10+5:30
पाथर्डी/अहमदनगर : माजी आमदार राजीव राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मोनिका राजळे यांनी परळी येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित आहे.

राजळेंचा उद्या भाजपाप्रवेश!
पाथर्डी/अहमदनगर : माजी आमदार राजीव राजळे व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा मोनिका राजळे यांनी परळी येथे भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याचे वृत्त आहे. गुरुवार, २५ रोजी त्यांचा भाजपा प्रवेश असून आगामी विधानसभा निवडणुकीत पाथर्डी-शेवगांव मतदारसंघातून मोनिका राजळे लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. राजळे किंवा भाजपाकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी राजळेंचा बहुप्रतीक्षीत भाजपा प्रवेश निश्चित झाल्याने मतदारसंघातील गणिते बदलणार आहेत. दरम्यान, या अपेक्षीत घडामोडीबद्दल राष्ट्रवादीत कसलीही प्रतिक्रिया उमटलेली नाही.
रविवारी माजी आ.राजीव राजळे , मोनिका राजळे, उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, दिलीप लांडे, सोमनाथ खेडकर, संजय बडे, बंडू रासने आदिंनी परळी येथे जावून भाजपाच्या नेत्या आ.पंकजा मुंडे यांची भेट घेवून भाजपा पक्ष प्रवेश व आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केल्याचे वृत्त आज दिवसभर जिल्ह्यात चर्चेत होते. आ.मुंडे यांनी राजळेंच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणुकीत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात आ.चंद्रशेखर घुले यांना आव्हान फक्त राजळेच देवू शकतात. त्यामुळे मोनिका राजळेंची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा राजळे समर्थक गेल्या काही दिवसांपासून करत होते. त्याला आता बळकटी येत आहे. मोनिका राजळे यांच्या भाजपा उमेदवारीचे स्पष्ट संकेत वरिष्ठ भाजपा नेत्यांनी तसेच आ.पंकजा मुंडे यांनी दिल्याचे म्हटले जात आहे. तसेच मतदारसंघातील जुन्या भाजपा नेत्यांना विश्वासात घेवून पावले उचलावीत असेही त्यांनी सुचविल्याचे कळते. माजी आ.राजळे हे मुंबई येथे जाणार असून ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भेटणार असून येत्या २५ तारखेला मुंबई येथे पक्षसोहळा होणार असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, माजी आ.राजीव राजळे यांचा भाजपा प्रवेश व संभाव्य उमेदवारी राजळे घराण्यातील असणार हे लक्षात घेवून आ.चंद्रशेखर घुले यांनी आधीच तयारी केली आहे. तसेच तालुक्यातील महत्वाच्या व विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक घेवून निवडणुकीत काय रणनीती आखायची याबाबत चर्चा केली. एकूणच राजळेंच्या उमेदवारीचा आ.घुले यांनी धसका घेतल्याची चर्चा आहे.
मंगळवारी दिवसभर आ.पंकजा मुंडे, मोनिका राजळे आणि राजीव राजळे यांचे छायाचित्र सोशल मीडियावर फिरत होते. त्यामुळे राजळेंच्या भाजपा प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे म्हटले जात होते. यामुळे भाजपाचे निष्ठावान मात्र चक्रावून गेल्याचे दिसले. याबाबत भाजपाचे इच्छुक उमेदवार व ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे यांना विचारले असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षात जो कोणी येईल त्याचे आम्ही स्वागतच करू. परंतु विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत आ.पंकजा मुंडे व वरिष्ठ भाजपा नेत्यांनी निष्ठावंतांनाच उमेदवारी दिली जाईल असा शब्द दिलेला आहे. काहीही झाले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)
गांधी गटाचा विरोध
दरम्यान, राजळेंच्या पक्ष प्रवेशाला भाजपातील खा.दिलीप गांधी गटाने विरोध केल्याचे वृत्त आहे. ही चर्चाच त्यांनी फेटाळून लावल्याचे म्हटले जाते. गांधी यांना लोकसभा निवडणुकीत राजीव राजळे यांच्याशी लढत द्यावी लागली होती. मंगळवारी मुंबईतील भाजपा बैठकीत याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे कळते. यापूर्वी गांधी समर्थकांनी बबनराव पाचपुते यांच्याही भाजपा प्रवेशाला जाहीर विरोध केला होता.