अहमदनगर: शहर व परिसरातील पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र उत्तर नगर जिल्ह्यातील पावसाचा जोर कायम असून, उत्तरेतील तालुक्यांत रविवारी ८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात पुन्हा सोमवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.गेल्या चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत हजेरी लावली. बहुतांश तालुक्यांत जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दक्षिण नगर जिल्ह्यात रविवारी पावसाने उघडीप दिली. त्यामुळे चौथ्या दिवशी रविवारी सूर्यदर्शन झाले. परंतु उत्तर जिल्ह्यातील तालुक्यांत ८.९ मि.मी. पाऊस झाला. तसेच सोमवारी पुन्हा काही ठिकाणी पाऊस झाला. उत्तर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, या पावसाने रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी खरिपाची पिके मोठय़ा प्रमाणात वाया गेली. रब्बीची पिकेदेखील पाण्याअभावी धोक्यात होती. पाणी नसल्याने ज्वारी करपू लागली होती. परंतु नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारीला जीवदान मिळाले. उसाच्या पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरला आहे. फळबाग, कांदा आणि कापूस, या पिकांना पावसामुळे फटका बसला. परंतु नुकसानीचे प्रमाण अत्यल्प असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली होती. टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. पाणीटंचाई दूर झाली, असे म्हणता येणार नाही. पण आजचे पाणी संकट पुढे ढकलले आहे.- अनिल कवडे, जिल्हाधिकारी
पारनेर येथे १२ मेंढय़ा मृत्युमुखी■ अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून याविषयीचे पंचनामे हाती घेण्यात आले. पारनेर तालुक्यातील गांजीभोयरे येथे १२ मेंढय़ा मृत्युमुखी पडल्या आहेत.
■ पाथर्डी तालुक्यात कांद्याचे पीक घेतले जाते. कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकर्यांचा कल आहे. सध्या सर्वत्र खरीप कांद्याची काढणी सुरू आहे. अवकाळी पावसाने पाथर्डी तालुक्यात एक हेक्टर कांदा शेतातच भिजला असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.