भंडारदरा, मुळा धरण पाणलोटात पावसाची उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:33 IST2020-07-22T13:32:57+5:302020-07-22T13:33:28+5:30
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने जवळपास पूर्णपणे उघडीप दिली आहे.

भंडारदरा, मुळा धरण पाणलोटात पावसाची उघडीप
राजूर : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने जवळपास पूर्णपणे उघडीप दिली आहे. या दिवसात जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणा-या घाटघर, रतनवाडी परिसरात धो धो पाऊस कोसळायचा. त्याठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी अवघ्या पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मागील दोन दिवसांपासून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाऊस गायब झाल्याची चिन्हे दिसत आहेत. गतवर्षी या दिवसांत भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते तर धरणांमध्ये नवीन पाण्याची आवकही झपाट्याने होत होती. मात्र या वर्षी याच परिसराला पावसाची वाट पहावी लागत आहे.
अचानक पाऊस थांबल्याने तिन्ही धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवकही एकदम मंदावली आहे. भंडारदरा धरणात बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत अवघे ३८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होती.
पाणीसाठा ४ हजार ९४५ दशलक्ष घनफूट इतका झाला. मुळा धरणातही केवळ ३० दशलक्ष घनफूट नव्याने पाणी येत साठा ९ हजार ४३५ दशलक्ष घनफूट इतका झाला. निळवंडे धरणात पाणीच न आल्याने या धरणातील पाणीसाठा स्थिर म्हणजेच ४ हजार ३३३ दशलक्ष घनफूट इतकाच आहे.