पाऊस झाला छोटा
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:31:29+5:302014-08-01T00:22:49+5:30
अहमदनगर: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू आहे़ नद्या दुथड्या वाहू लागल्या आहेत़ धुवाँधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला आहे़ सर्वत्र मोठा पाऊस पडत आहे़

पाऊस झाला छोटा
अहमदनगर: राज्यातील बहुतांश जिल्ह्यात धो-धो पाऊस सुरू आहे़ नद्या दुथड्या वाहू लागल्या आहेत़ धुवाँधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला आहे़ सर्वत्र मोठा पाऊस पडत आहे़ मात्र काही तालुका वगळता नगर जिल्ह्यात मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरवली आहे. जिल्हाभर हलका पाऊस होत असून, सरासरी ५ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़
नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे़ या परिसरात झालेल्या पावसामुळे मुळा व भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक झाली आहे़ बहुतांश शहरात मोठा पाऊस पडल्याच्या बातम्या आहेत़ नगर जिल्ह्यात पाऊस पडतो आहे़ जिल्हा ओला झाला खरा, पण दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे़ पाऊस सारखा हुलकावणी देत आहे़ पावसाचा जून व जुलै गेला आहे़ तरीदेखील समाधानकारक पाऊस झालेला नाही़ पाऊस एकदमच नाही, अशीही स्थिती नाही़ कमीअधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे़ परंतु त्याला फारसा जोर नाही़ एकमेव अकोले तालुक्यातील जुलै अखेरच्या पावसाने टक्केवारीची चाळिशी ओलांडली आहे़ इतर तालुक्यांत ही टक्केवारी २० पेक्षाही कमी आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, मंगळवारी ११ मि़ मी़ पावसाची नोंद झाली असून, बुधवारी ती ५ मि़ मी़ इतकी झाली आहे़ अनुकूल वातावरण असूनही ही स्थिती आहे़ अकोले तालुक्यात सर्वाधिक ४१ मि़ मी़ पाऊस झाला़ तेथील पावसाचाही जोर आता ओसरल्याचे सांगण्यात आले आहे़
गतवर्षी जुलै अखेर ५४ टक्के इतका पाऊस पडला होता़ चालूवर्षी तो २२ टक्यांवरच रेंगाळला आहेग़तवर्षीच्या तुलनेत ३२ मि़मी़ कमी पाऊस आहे़ मागील दोन महिन्यांची मागे पडलेली सरासरी पाऊस भरून काढील, अशी चिन्हे आहेत़ मात्र पोषक वातावरण असूनही सरासरी पुढे सरकेनाशी झाली आहे़ कोणत्याच तालुक्यात मोठा पाऊस पडलेला नाही़ त्यामुळे भर पावसाळ्यातही टँकर सुरू आहेत़ आज ना उद्या येईल, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे़
(प्रतिनिधी)
पाणी साठा
(दलघफू )
मुळा- ११,५३९, भंडारदरा- ६,७८४, निळवंडे- २,१७६, आढळा- १८७, मांडओहळ-५३़०५, घाटशीळ- निरंक, घोड- १,८१८, खैरी- १६़ २६, सीना- २७
गारवा वाढला
सकाळपासून ढग येतात़ सूर्याचे दर्शन होत नाही़ त्यामुळे वातावरणातील गारवा कमालीचा वाढला असून, रोगराईही वाढली आहे़ अत्यल्प पावसाने रस्ते ओले हाऊन शहरातही कमालीची चिडचिड झाली आहे़ जोराचा पाऊस न झाल्याने रस्ते चिखलमय झाले आहेत़