भंडारदरा-मुळा धरण पाणलोटात पाऊस पुन्हा सक्रिय
By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:34:02+5:302014-07-29T01:04:58+5:30
अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’
भंडारदरा-मुळा धरण पाणलोटात पाऊस पुन्हा सक्रिय
अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’ या काव्याच्या ओळी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी नगर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांच्या पुढे गेला एवढीच जमेची बाजू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८ ते २० टक्के पेरण्या झाल्या आहेत.
(प्रतिनिधी)
सोमवारी नोंदविलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)
जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळात ४९७.४ मिमीच्या सरासरीने ६ हजार ९६३ पाऊस पडत
असतो. आतापर्यंत ८८.२१ मिमीच्या सरासरीने १ हजार २०६ पाऊस झालेला आहे. पावसाची ही टक्केवारी अवघी १७ टक्के आहे. सोमवारी जामखेड १०, कर्जत ३, पाथर्डी २८, शेवगाव २१, नगर २ , नेवासा २५ झालेला आहे.
धरण साठे (दशलक्ष घनफुटात)
मुळा ८ हजार ११३ (३१.२० टक्के), भंडारदरा ३ हजार ६२९ (३१.२० टक्के), निळवंडे ८३४ (१६ टक्के), आढळा १४७ (१३. ८७टक्के), मांडओहळ५४.९८ (१३.७८ टक्के), घोड १८१८ (२३. ८० टक्के), खैरी १७. ६ (३.२० टक्के), सीना ३१ (१.२९ टक्के), घाटशिरस निरंक
मुळात पाण्याची आवक
धरणाच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मुळा धरणात ३२१२ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळीधरणात ८३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. सोमवारी दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते़ गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडिप दिली होती. परंतु सोमवार सकाळपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. मुळा धरणात आतापर्यंत झालेल्या पाणीसाठ्यात वर्षभराचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे़ अजून समाधानकारक पावसाने हजेरी लावली तर शेतीसाठीही आवर्तन उपलब्ध होऊ शकते़ धरणातील साठा १३ टीएमसीच्या पुढे गेल्याशिवाय शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य आहे़
घाटघर, हरिश्चंद्रगड परिसरात पाऊस
अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या उगमस्थानी असलेल्या अमृतेश्वर शिवालय परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड आदिवासी भागात श्रावणसरींचा अभिषेक सुरु झाला आहे. गुरुवारपासून रजेवर गेलेला पाऊस सोमवारी पुन्हा सक्रिय झाला. डोंगरदरीतील ओढे-नाले खळखळत असल्याने बलठण, घाटघर, वाकी,आंबीत, कोथळे व शिळवंडी लघूपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. गेल्या चोविस तासांत भंडारदरा धरणात ११३, तर निळवंडेत ३४ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. बलठण व कोथळा तलावातून २०० क्युसेक, तर वाकीतून १९७ क्युसेक पाणी विसर्ग सुरूआहे. रविवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमिटरमध्ये घाटघर- ६१(१३१०), रतनवाडी- ६३ (१५६२), पांजरे १५ (७७७), वाकी- १४ (६६२), भंडारदरा- १६ (६३१), कोतूळ १ (११४), निळवंडे- १(१३६), आढळा- ०(३३), अकोले- ० (७०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी, बहिरवाडी परिसरात गुरूवारी दिवसभर श्रावणसरी कोसळत होत्या. आढळा खोऱ्यातही पावसाचा जोर थोडा वाढला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर कमी झाला असून मुळा नदीपात्रातून ३ हजार ३१२ क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे.