रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:07+5:302021-03-18T04:21:07+5:30

अहमदनगर : एमपीएससी परीक्षांच्या आयोजनाचा घोळ संपत नाही तोच आता ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक पेच निर्माण ...

Railway exam or MPSC? | रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची?

अहमदनगर : एमपीएससी परीक्षांच्या आयोजनाचा घोळ संपत नाही तोच आता ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. २१ मार्चला एमपीएससीच्या परीक्षा होत असताना याच दिवशी रेल्वेची ही परीक्षा आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

एमपीएससी परीक्षेच्या आयोजनावरून गेल्या आठवड्यापासून गोंधळ सुरू आहे. याआधी १४ मार्चला होणारी ही परीक्षा एमपीएससीने अचानक पुढे ढकलली. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणारे हजारो तरूण महाराष्ट्रातील विविध शहरात रस्त्यावर उतरले. शासनाने याची त्वरित दखल घेत दुसऱ्याच दिवशी परीक्षेची तारीख जाहीर केली. गेल्या वर्षभरात कोरोनाचे कारण देत एमपीएससीने ही परीक्षा पाच वेळी पुढे ढकलली आहे. त्यामुळे तयारी करणारे विद्यार्थी पुरते वैतागले आहेत. अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे, तर बऱ्याच जणांना वयोमर्यादा अडचण ठरत आहे.

आता एकदाची २१ मार्चला ही परीक्षा होत आहे. परंतु त्याआधीच रेल्वे विभागाने त्यांची परीक्षा जाहीर केलेली असून ती ही परीक्षा २१ मार्चला आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. रेल्वेची परीक्षा द्यायची की एमपीएससीची अशा दुहेरी संकटात हे विद्यार्थी सापडले आहेत.

-----------

दोन्ही परीक्षा - २१ मार्च

एमपीएससीसाठी विद्यार्थी - १५, ८४७

परीक्षा केंद्रे - ५१

-------

रेल्वेची परीक्षा ऑनलाईन

रेल्वेची ३२ हजार २०८ जागांसाठीच ही परीक्षा आधीच जाहीर झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा ऑनलाईन होते. नगर जिल्ह्यातून सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे.

------

केंद्रांवर पोहोचण्यासाठी कसरत...

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना विद्यार्थ्यांना केंद्रांवर पोहाेचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रावर तपासणी करूनच आत सोडले जाणार असून यात एखादा परीक्षार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आढळला तर त्याला पीपीई कीट घालून परीक्षेला बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

------------शासनाने परीक्षांचे आयोजन करण्यात प्रारंभीपासून मोठा घोळ केला आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. दोन दोन वर्षे परीक्षांच्या तारखाच जाहीर होत नाहीत. दुसरीकडे दोन परीक्षा एकत्र येणार असतील तर अनेकांचे नुकसान होणार आहे.

- रवींद्र पाठक, परीक्षार्थी

----------

शासनाने एमपीएससी परीक्षांच्या आयोजन बाबत गांभीर्याने विचार करायला हवा. इतर सर्व परीक्षा होतात, मग कोरोनाची अडचण एमपीएससी परीक्षांनाच कशी येते. आता रेल्वेची व राज्य सेवेची या दोन्ही परीक्षा एकत्र येत असतील तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार आहे.

- श्वेता गवळी, परीक्षार्थी

----------

१७एमपीएससी डमी १,२,३,४

Web Title: Railway exam or MPSC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.