अहमदपुरात छापा; बनावट नोटा जप्त तिघांविरुद्ध गुन्हा : कारसह पाच लाखांचा गुटखा पकडला
By राजकुमार जोंधळे | Updated: March 26, 2025 22:27 IST2025-03-26T22:26:56+5:302025-03-26T22:27:56+5:30
या कारवाईने खळबळ उडाली असून, याबाबत अहमदपूर ठाण्यात तिघांविराेधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

अहमदपुरात छापा; बनावट नोटा जप्त तिघांविरुद्ध गुन्हा : कारसह पाच लाखांचा गुटखा पकडला
अहमदपूर (जि. लातूर) : अंबाजाेगाई राेडवरील एका लाॅजनजीक टाकलेल्या छाप्यात बनावट नाेटा, गुटखा आणि कार असा ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने खळबळ उडाली असून, याबाबत अहमदपूर ठाण्यात तिघांविराेधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी अवैध व्यवसायावर कारवाईचे आदेश दिले आहेत. डीवायएसपी मनिष कल्याणकर, सहायक पाेलिस अधीक्षक सागर खर्डे यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे. रात्री पथक गस्तीवर असताना खबऱ्याने माहिती दिली. याच्या आधारे सकाळी ७ वाजता अहमदपूर शहरातील क्रांती चौकात चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, वाहतूक केली जाताना छापा मारला. यावेळी कारसह (एम.एच १२ एल.पी. ५७५०) तब्बल २ लाख ९२ हजार १०० रूपयांच्या मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात अल्लाबक्ष इलाही तांबोळी (वय ३१ रा. अहमदपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बनावट नाेटा चलनात आणताना पथकाची धाड...
अहमदपूर येथील एका लॉजनजीक दोघे बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली. पाेलिस पथकाने सायंकाळी ७:५० वाजता सापळा रचून धाड टाकली. यावेळी ५००, २०० आणि १०० रूपयांच्या १२ हजार ७०० रुपये किंमतीच्या बनावट नोटांसह जुने मोबाईल, वाहनासह (एम.एच २४ व्ही. ४८४७) एकूण १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत अहमदपूर ठाण्यात मिर्झा शोएब बेग मिर्झा अन्वर बेग (वय २९) व एक अल्पवयीन मुलगा (दाेघेही रा. हिंगोली नाका, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे.
एका महिन्यात सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त...
सहायक पाेलिस अधीक्षक सागर खर्डे यांनी आठवडाभरात अवैध व्यवसायावर माेठ्या प्रमाणावर कारवाई केली असून, जवळपास एक महिन्यात अवैद्य वाळू, गुटख्यावर धाडी टाकल्या आहेत. त्यांनी केलेल्या कारवाईत सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत.