श्रीगाेंदा शहरातील लसीकरण केंद्रावर धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST2021-05-17T04:18:30+5:302021-05-17T04:18:30+5:30
श्रीगोंदा : शहरातील पंतनगरमधील लसीकरण केंद्रावर रविवारी सकाळी प्रचंड गोंधळ झाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत लस घेण्यासाठी आलेली एक ...

श्रीगाेंदा शहरातील लसीकरण केंद्रावर धक्काबुकी
श्रीगोंदा : शहरातील पंतनगरमधील लसीकरण केंद्रावर रविवारी सकाळी प्रचंड गोंधळ झाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत लस घेण्यासाठी आलेली एक ज्येष्ठ महिला जखमी झाली.
येथे रविवारी सकाळी नागरिक लसीसाठी रांगेत उभे होते. परंतु, लसीकरण सुरू होण्याआधी ज्येष्ठांना आधी प्राधान्य दिले जाईल, असे एका स्वयंसेवकाने जाहीर करताच एकच गोंधळ उडाला. तरुणांनी गेट बंद असताना त्यावरून उड्या मारून आत प्रवेश केला. गेट उघडताना रेटारेटी आणि धक्काबुक्की झाली. त्याचवेळी लसीकरणासाठी गर्दी गेलेल्या लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत लस घेण्यासाठी आलेली एक ज्येष्ठ महिला खाली पडून जबर जखमी झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
----
लसीकरण केंद्रांवर गर्दी..
श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील लसीकरण केंद्र गर्दीची ठिकाणे बनली आहेत. तेथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. पोलिसांचे नियंत्रण नाही. त्यामुळे धक्काबुक्कीच्या घटनांत वाढ होत आहे. याचे आरोग्य विभाागाने नियोजन करणे गरजेचे आहे.
---
लस उपलब्धेनुसार लसीकरण कार्यक्रम चालू आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यामध्ये काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तरी नागरिकांनी गोंधळ घालणे बरोबर नाही.
-डॉ. नितीन खामकर,
तालुका वैद्यकीय अधिकारी, श्रीगोंदा
---
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीकरणाबाबत पहिला डोस, नंतर दुसरा डोस नेमका कधी दिला जाणार आरोग्य विभागाने माहिती द्यायला हवी. त्यांनी लसीकरणाचे वेळापत्रकच जाहीर केले तर गोंधळ होणार नाही. ज्येष्ठ नागरिकांचे हालही होणार नाहीत.
-सुदाम गणपत कोथिंबिरे,
श्रीगोंदा