अनुदानासाठी जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सक्ती
By Admin | Updated: May 23, 2016 01:13 IST2016-05-23T00:19:25+5:302016-05-23T01:13:21+5:30
अहमदनगर : रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, अशी सक्तीच महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून, अनुदानासाठी जिल्हा बँकच का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे़

अनुदानासाठी जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सक्ती
अहमदनगर : रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, अशी सक्तीच महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असून, अनुदानासाठी जिल्हा बँकच का, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे़ विशेष करून उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या अनुदानासाठी ही सक्ती केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे़
सततच्या नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत़ सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे़ ही मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते़ पावसाळा तोंडावर आल्याने रब्बीच्या सरकारी मदतीवर शेतकऱ्यांची भिस्त आहे़ शेतीच्या मशागतीसाठी हे पैसे उपयोगी पडतील, अशी आशा शेतकरी बाळगून आहेत़ अद्याप रब्बीचे अनुदान जरी आले नसले तरी ते आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम गाव पातळीवर सध्या सुरू आहे़
ही यादी तयार करताना जिल्हा बँकेत खाते उघडण्याची सक्ती काही गावांत केली जात असल्याचे समोर आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असूनही, जिल्हा बँकेत खाते कशासाठी उघडायचे, असा प्रश्न शेतकरी करत आहेत़ शेतकरी व गाव तलाठ्यामध्ये वाद होत आहेत़ हा विषय ग्रामीण भागात चर्चेचा ठरला आहे़
लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्यानुसार बँकेच्या नावे धनादेश दिला जातो़ शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या बँकांत खाते उघडलेले असतात़ त्यानुसार ही मदत बँकेत जमा करण्यात येते़ हे काम सोपे व्हावे, यासाठी एकाच बँकेत खाते उघडण्याचे सक्तीचे करण्यात येत असावे, असा एक मतप्रवाह आहे़ परंतु, प्रशासनाच्या सोयीसाठी शेतकऱ्यांना हा भुर्दंड का, असा प्रश्न आहे़ तर प्रशासनाकडून अशी कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही़
बँकनिहाय याद्या तयार करून संबंधितांच्या खात्यावर सरकारी मदत जमा करण्याची पध्दत आहे, असे वरिष्ठ कार्यालयाचे म्हणणे आहे़ असे असूनही बँक खाते उघडण्याची सक्ती का ? याचा शोध घेण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे़
(प्रतिनिधी)
रब्बीचे अनुदान हवे असल्यास जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सक्ती करण्यात येत आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत खाते असूनही जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडा, असे गावातील तलाठी सांगत आहेत़
-शेतकरी
रब्बीच्या अनुदानासाठीच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे़ एकाच बँकेतील खाते असतील तर अनुदान वितरीत करणे सोपे जाते़ पण, अशी सक्ती नाही.
-नामदेव टिळेकर, तहसीलदार