पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 19:09 IST2018-06-17T19:09:32+5:302018-06-17T19:09:43+5:30
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर टेकड्यांवरील धोकादायक दगड काढण्याचे काम सुरु आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर धोकादायक दगड काढण्याचे काम सुरू
घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगर टेकड्यांवरील धोकादायक दगड काढण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरू असताना एक मोठा दगड थेट महामार्गाच्या मध्यावर आला. सुदैवाने यामुळे होणारा अपघात टळल्याची घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कुरकुंडी शिवारात घडली.
कुरकुंडी परिसरात सुरु असलेल्या कामाच्या दरम्यान एक मोठा दगड अचानक रस्त्याच्या मध्यापर्यंत आल्याने, कामगारांची तारांबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी या ठिकाणी एखादे वाहन नसल्याने संभाव्य अपघात टळला. महामार्गाशी संबंधीत अनेक कामे ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने, या मार्गावर वारंवार अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. पठार भागातील चंदनापुरी घाट, कुरकुंडी परिसर व एकल घाटातील धोकादायक वळण या ठिकाणी उभा डोंगर तासून रस्ता बनविण्यात आला आहे. पावसाळ्यात या परिसरात लहान मोठ्या दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे महामार्ग व्यवस्थापनाने अनेक धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या लावल्या आहेत. तरीही काही ठिकाणी असलेले मोठे धोकेदायक दगड जेसीबीने फोडून काढण्याचे काम गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु आहे. यासाठी रस्त्याच्यामध्ये बॅरिकेट टाकून एकेरी मार्गाचा वापर सुरु आहे.
अनेक कामे प्रलंबित
गेल्या महिन्यात या परिसरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसिलदार साहेबराव सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, महामार्गाशी संबंधित सर्व प्रलंबित कामे तातडीने करण्याचे ठरले होते. बोटा, साकुर फाटा येथील सर्व्हिसरोड, दिशादर्शक फलक, गतीरोधक अशी कामे अद्यापही प्रलंबित आहेत.