अहमदनगर : राज्याच्या अर्थसंकल्पात अहमदनगर विधानसभा मतदार संघातील रस्ते व पुलांच्या कामासाठी २० कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सन २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात नगर शहरातील विविध विकास कामांसाठी निधी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार केडगाव लिंक रोड चौपदरीकरणासाठी ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केडगाव उपनगरातील अर्चना हॉटेल ते केडगाव बाह्यवळण रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ८ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. बुरुडगाव येथील सीना नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी ५ कोटी ५० लाखांची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली असल्याचे जगताप यांनी कळविले आहे.
नगर शहराच्या विकास आराखड्यातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधीची मागणीही आमदार जगताप यांनी शासनाकडे केली आहे. या रस्त्यांची लांबी जास्त असल्याने महापालिकेच्या निधीतून करणे शक्य नाही. शहरातील लोकवस्ती वाढत असल्याने प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. विकास आराखड्यात शहरातील प्रमुख ८३ रस्त्यांचा समावेश आहे. यापैकी प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी मागणी करण्यात आली असून, त्यासाठी निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे जगताप म्हणाले.
...
भुईकोट किल्ला सुशोभिकरणासाठी निधीची मागणी
शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला सुशोभिकरणाचे काम निधी अभावी रखडले आहे. सुशोभिकरणाचे काम सुरू करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात किल्ला सुशोभिकरणासाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले.
...