कोळगावातील बसस्थानकासाठी खासदार निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:37+5:302021-07-26T04:20:37+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी बसस्थानकासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून भरीव निधी मिळावा, ...

कोळगावातील बसस्थानकासाठी खासदार निधी द्या
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी बसस्थानकासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून भरीव निधी मिळावा, अशी मागणी सरपंच वर्षा काळे, उपसरपंच अमित लगड व पदाधिकाऱ्यांनी ठरावाद्वारे केली आहे.
कोळगाव हे क्षेत्रफळाच्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. या गावची लोकसंख्या १३ हजार असून गावाला आजूबाजूला बारा वाड्या आहेत. तसेच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे. गावातील महिला, वयोवृद्ध व्यक्ती, विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रवाशांना एसटीने अहमदनगर, दौंड, श्रीगोंदा, सांगली, औरंगाबाद, नाशिक येथे प्रवास करावा लागतो. परंतु, कोळगाव येथे बसस्थानक उपलब्ध नसल्याने त्या सर्व प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस झेलत एसटी बसची वाट पाहत मोकळ्या जागेत उभे राहावे लागते. सध्या गावात कालबाह्य झालेले बसस्थानक आहे. त्याठिकाणी एसटी बस उभी राहण्यासाठी जागा नाही. एसटी ज्या ठिकाणी उभी राहते, त्या ठिकाणी प्रवाशांना निवारा नसल्याने उन्हात उभे राहावे लागते. परिस्थितीचा विचार करून कोळगावचे उपसरपंच अमित लगड यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीच्या जागेत नवीन बसस्थानकाचे बांधकाम करण्यासाठी खासदार सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून भरीव निधी मिळावा, या मागणीचा ठराव मांडला. तो सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने मंजूर केला. त्या ठरावाचे पत्र आणि मागणीपत्र शुक्रवारी (दि.२३) विखे यांना अहमदनगर येथील कार्यालयामध्ये देण्यात आले. या मागणीची दखल घेऊन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विखे यांनी दिले. यावेळी कोळगावचे उपसरपंच अमित लगड, सरपंच पती अमोल काळे, ग्रामपंचायत सदस्य नितीन मोहारे, प्रदीप भापकर, नागेश काळे, प्रशांत नलगे आदी उपस्थित होते.