वरखेड येथे हजारो भाविकांच्या गर्दीत भरली यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:22 IST2021-07-31T04:22:48+5:302021-07-31T04:22:48+5:30

नेवासा (जि. अहमदनगर) : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांचे आकडे वाढत असतानाच नेवासा तालुक्यातील वरखेड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मीआईची यात्रा ...

A procession full of thousands of devotees at Varkhed | वरखेड येथे हजारो भाविकांच्या गर्दीत भरली यात्रा

वरखेड येथे हजारो भाविकांच्या गर्दीत भरली यात्रा

नेवासा (जि. अहमदनगर) : जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांचे आकडे वाढत असतानाच नेवासा तालुक्यातील वरखेड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लक्ष्मीआईची यात्रा भरल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. अंधश्रद्धा निमूर्लन समितीने महसूल, पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर तेथील गर्दी हटविण्यात आली. मात्र याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. कोरोनामुळे सध्या मंदिरे बंद असून यात्रा-जत्रा, इतर उत्सवही बंद आहेत. कोरोनामुळे ही यात्रा भरणार नाही, असे वाटत होते. मात्र, ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा आरगडे यांनी तेथे भेट दिली असता मोठ्या गर्दीत ही यात्रा भरल्याचे आढळून आले. त्यांनी हा प्रकार ॲड. रंजना गवांदे यांना सांगितला. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संपर्क करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने तेथे वाहतूक पोलीस आले. त्यांनी गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न केला. त्यानंतर तहसीलदार आणि अन्य अधिकारी तेथे आले. दुपारनंतर गर्दी हटविण्यात आली.

गावातील लक्ष्मी आईची ही यात्रा आषाढ महिन्यात भरते. ‌आषाढ महिन्यात ‌दर‌ शुक्रवार, रविवार, ‌मंगळवारी ही यात्रा असते. म्हणजेच ‌यात्रेचा शुक्रवारी नववा दिवस होता. यात्रेच्या दिवशी हजारोंच्या ‌संख्येने‌ लोक उपस्थित असतात. शुक्रवारीही मोठ्या संख्येने भाविक आले होते. या यात्रेत पशुहत्या केली जाते. ती बंद करण्यासाठी ‘अंनिस’चे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी चार ते पाच हजार बोकडांचा बळी येथे दिला जातो. मोठ्या प्रमाणात दारूचीही विक्री होते.

---

दुकानेही थाटली..

येथे दूरवरून भाविक दर्शनासाठी येत होते. काही दुकानेही थाटली होती. वाहनांमधून दाटीवाटीने भाविक प्रवास करीत होते. कोरोनाच्या काळात गर्दी आणि संपर्क टाळणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करून हे प्रकार सुरूच होते.

---

जिल्ह्यात कोरोनाबाबतचे निर्बंध कायम असताना व बंदी असतानाही एवढी मोठी यात्रा भरतेच कशी हा प्रश्न आहे. राज्यभरातून हजारो भाविक येथे आले होते. त्यामुळे काेरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यानेच भाविकांची गर्दी झाली. आता प्रशासन येथे यात्रा भरविणारांवर कारवाई करणार का?

-बाबा आरगडे,

सामाजिक कार्यकर्ते

Web Title: A procession full of thousands of devotees at Varkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.