प्राचार्य, शिक्षिका निलंबित
By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-05T23:10:47+5:302014-07-06T00:18:19+5:30
कर्जत : विद्यार्थिनीचा प्रकल्प बदलल्याप्रकरणी अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना शनिवारी (दि़५) संस्थेने निलंबीत केले़
प्राचार्य, शिक्षिका निलंबित
कर्जत : विद्यार्थिनीचा प्रकल्प बदलल्याप्रकरणी अमरनाथ विद्यालयाचे प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना शनिवारी (दि़५) संस्थेने निलंबीत केले़ तसेच याप्रकरणी अन्य दोन शिक्षकांची चौकशी लावण्यात आली. या निर्णयानंतर विद्यार्थिनी व इतरांनी सुरु केलेले उपोषण शनिवारी (तिसऱ्या दिवशी) मागे घेतले.
अमरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावीमधील विद्यार्थिनी ज्योती तावरे व रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलूमे यांनी कर्जत तहसील पुढे आमरण उपोषण सुरू केले होते. या विद्यार्थिनीवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ हे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू होते. यातील दोषींना निलंबीत करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी होती. त्यानुसार यशवंत शिक्षण संस्थेचे मानद सचिव लक्ष्मणराव लांगोरे यांनी शनिवारी प्राचार्य अरुण भोगील व विषय शिक्षिका उर्मिला पाटील यांना निलंबीत केले. या दोघांनाही निलंबीत केल्याचे संस्थेने तहसीलदारांना लेखी कळविले आहे.
उपशिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी शनिवारी उपोषणार्थींची भेट घेतली. उपोषणार्थींच्या मागणीनुसार त्यांनी उपप्राचार्य विकास गावडे व शिक्षक आंबादास चाकणे यांची चौकशी करून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले़ यावेळी तहसीलदार जयसिंग भैसडे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, गट शिक्षणाधिकारी अंकुश जंजीरे, दत्ता कदम, विशाल काकडे आदी उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)