कामगाराच्या मुलाचे पगारासाठी पंतप्रधानांना साकडे; तनपुरे साखर कारखान्याने थकविला ५० महिन्यांचा पगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:04 IST2020-05-02T15:03:27+5:302020-05-02T15:04:13+5:30
डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे.

कामगाराच्या मुलाचे पगारासाठी पंतप्रधानांना साकडे; तनपुरे साखर कारखान्याने थकविला ५० महिन्यांचा पगार
राहुरी : येथील डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे.
तनपुरे साखर कारखाना हा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून कामगारांचे पगार देण्याचा आदेश देवा अशी विनंती कराळे यांनी पत्राद्वारे केली आहे. कारखान्याच्या पगार मिळावा म्हणून कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. तरी देखील कारखान्याने पगार देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. कामगारांचे पगार देण्याचे शासनाचे धोरण असतानाही कारखाना मात्र पगार देत नाही. कामगारांकडे पैसा नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे, असेही असे कराळे यांनी पत्रात म्हटले आहे.
पगारासाठी केवळ आश्वासनेच
लॉकडाऊनच्या काळात कामगारांचे पगार थकित ठेवू नयेत, असा शासनाचा आदेश आहे. मात्र डॉ.बाबा तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांच्या पगाराचे १०० कोटी रुपये थकले आहेत. याबाबत कामगारांनी संचालक मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला. याशिवाय अनेक वेळा आंदोलनही छेडली. पगार देऊ एवढेच आश्वासन संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पगारासंदर्भात साकडे घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असली तरी अद्याप कामगारांना पगार मिळालेले नाही. पगार देता येत नसतील तर कामगारांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांनी केली आहे.