गुजरातमधून ऑक्सिजन विमानाने आणण्याची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST2021-05-07T04:22:00+5:302021-05-07T04:22:00+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आधी ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता, तो आता ५० मेट्रिक टन मिळत आहे. त्यामुळे ...

गुजरातमधून ऑक्सिजन विमानाने आणण्याची तयारी
अहमदनगर : जिल्ह्यात आधी ४० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता, तो आता ५० मेट्रिक टन मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. नाशिक येथील विमानतळावरून रिकामे टँकर गुजरातमध्ये पाठविण्यात येतील. नंतर ते रोडमार्गे आणण्याबाबत नाशिक आणि नगर जिल्ह्यात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना दिली.
विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी विभागीय उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महापालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी उदय किसवे, उर्मिला पाटील, उज्ज्वला गाडेकर, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे, मनपा उपायुक्त यशवंत डांगे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाणे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके उपस्थित होते.
यावेळी गमे म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. एका रुग्णाच्या संपर्कातील किमान २० जणांच्या चाचण्या होण्याची गरज आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशांची जागेवरच कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी आता पोलिसांकडे देण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांना सूचना दिल्या आहेत. चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांची थेट विलगीकरण कक्षात रवानगी केली जाईल. नागरिक नियम पाळत नसतील तर त्यांना पोलिसांनीच शिस्त लावावी.
----
प्रत्येक तालुक्याला शंभर कॉन्सन्ट्रेटर, दोन ड्युरा सिलिंडर
कोपरगाव राहाता, संगमनेर या भागातील नागरिक नाशिकला बेडची मागणी करीत आहेत. १६ मे नंतर एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करायचे आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी नियोजन करीत आहेत. प्रत्येक तालुक्यात शंभर कॉन्सन्ट्रेटर विकत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात दोन ड्युरा सिलिंडर बसविण्याचेही प्रयत्न आहेत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये व इतर रुग्णालयांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था होऊ शकेल, तसेच जिल्ह्यात १२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, गरज असेल तरच डॉक्टरांनी रेमडेसिविर द्याव्यात, अशा सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत, असे गमे यांनी सांगितले.