‘त्या’ तिघा पोलिसांचा अटकपूर्व जमीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST2021-06-19T04:15:10+5:302021-06-19T04:15:10+5:30
शेवगाव : ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा ...

‘त्या’ तिघा पोलिसांचा अटकपूर्व जमीन फेटाळला
शेवगाव : ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटला तरी अद्यापही ते तिघे सापडलेले नाहीत.
शेवगाव पोलीस उपविभागीय कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील तिघा पोलिसांवर लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात ३ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वसंत कान्हू फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच हे तिघे पसार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील २७ वर्षीय तक्रारदराच्या वाळू वाहतुकीची ट्रक उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी पकडली होती. ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तसेच वाळू वाहतुकीसाठी ट्रक सुरू ठेवण्यासाठी त्या तिघांनी तक्रारदाराकडे १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तिघांनीही पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंति १५ हजार लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे तिघां पोलिसांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या तिघांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी दिली.