कंठाशी आले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:18+5:302021-04-09T04:22:18+5:30
जिल्ह्यात रोज सरासरी १६७० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गुरुवारी एका दिवसात २२३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ...

कंठाशी आले प्राण
जिल्ह्यात रोज सरासरी १६७० रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गुरुवारी एका दिवसात २२३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच दिवसात इतके रुग्ण येण्याचा हा वर्षभरातील उच्चांक ठरला आहे. जिल्ह्यात कोरोनाची साखळी वाढत आहे. उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजार ६३७ इतकी झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांचाही गुरुवारी उच्चांक झाला असून, ही संख्या आणखी वाढण्याबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
----------
‘रेमडेसिवीर’साठी नातेवाइकांची वणवण
नगर शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रुग्णांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक वणवण फिरत आहेत. नगर शहरातील अनेक रुग्णांच्या नातेवाइकांनी अक्षरश: औषध दुकानांचे उंबरठे झिजवले आहेत. ‘आमच्या रुग्णाचा जीव वाचवा, काहीही करा, पण इंजेक्शन द्या’, अशी याचना ते औषध विक्रेत्यांकडे करीत आहेत. नगर शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना गुरुवारी इंजेक्शन मिळाली नाहीत. इंजेक्शन न मिळाल्याने आता रुग्णांचे जीव जाण्याची वेळ आली आहे, अशीच स्थिती गुरुवारी नगरमध्ये पहायला मिळाली.
-------------
दोन हजार इंजेक्शनची कमी
एका खासगी रुग्णालयात गुरुवारी ७६ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ३६ जणांना देण्यासाठीच इंजेक्शन उपलब्ध होते. ही एका रुग्णालयाची स्थिती आहे. शहरात रोज दोन ते अडीच हजार इंजेक्शनची कमतरता आहे. आम्ही खासगी कंपन्यांकडे मागणी करीत आहोत; मात्र जेवढे इंजेक्शन मिळतात, तेवढे रुग्णांना दिले जातात, असे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी सांगितले.
-----------------
१२०० इंजेक्शन उपलब्ध. जिल्ह्यात ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण घरीच क्वारंटाईन आहेत. रुग्णालयात असलेल्या ४ ते ५ हजार रुग्णांना इंजेक्शनची गरज भासत आहे; मात्र तेवढे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. खासगी रुग्णालयांमध्ये एक हजार इंजेक्शनचा तुटवडा होता. सायंकाळच्यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून १२०० इंजेक्शन उपलब्ध झाले आणि ते रुग्णालयांना वाटप केले; मात्र इंजेक्शनची मागणी व उपलब्धता सध्या तरी कट टू कट आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त अशोक राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---------------
गुरुवारी २२३३ बाधित, १५ जणांचा मृत्यू
गुरुवारी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला. २४ तासात २२३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. २४ तासात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्हा रुग्णालयात एकाच दिवसात ३० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचे एका आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्याने सांगितले; मात्र पोर्टलवर एकाच दिवसात तेवढी नोंद नसल्याने गुरुवारी केवळ १५ जणांचीच नोंद झाली; मात्र कोरोनाची स्थिती गंभीर असून, सध्या ११ हजार ६३७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.
----------