वीज पुरवठ्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची चाचणी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:33+5:302021-06-22T04:15:33+5:30
शेवगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

वीज पुरवठ्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची चाचणी थांबली
शेवगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी लागणारी यंत्रसामग्री दाखल झाली आहे. मात्र हा प्रकल्प सुरू करताना चाचणी करण्यासाठी वीजपुरवठा नसल्याने प्रकल्पाचे काम रखडले आहे.
कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे राज्य सरकारने ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या अनुषंगाने येथील ग्रामीण रुग्णालयात १ कोटी ५३ लाख रुपये किमतीचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे काम ५ मे पासून युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान यंत्र बसविण्यासाठी पत्र्याचे २५ फूट रुंद व २५ फूट लांबीचे शेड उभारण्यात आले आहे. रविवारी ऑक्सिजन निर्मिती करणारे यंत्र दाखल झाले. ते यंत्र बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या यंत्राची चाचणी घेण्यासाठी ठरावीक दाबाने वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र रोहित्राची आवश्यकता आहे.
यासाठी महावितरणने लागणारे विजेचे खांब उभारले असून वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू आहे. यासाठीचे कोटेशन २१ मे रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवले होते. मात्र ते अद्यापपर्यंत न भरल्याने रोहित्र व मीटर महावितरणने बसवले नाही. परिणामी यंत्र चाचणी करण्यासाठी लागणारा ठरावीक दाबाचा वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने चाचणीचे काम रखडले आहे. प्रकल्प उभारणीचे काम पुणे येथील ब्रिसे केमिकल कंपनीला देण्यात आले होते. त्यांना हा प्रकल्प पूर्ण करून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती.
-------
यापूर्वी कोटेशन पाठविले आहे. आज पुन्हा पाठविले आहे. तिथे रोहित्र बसविण्याचे सद्यस्थितीत काम सुरू आहे. अद्याप संबंधितांनी कोटेशन भरलेले नाही. लवकरच रोहित्र बसवून मीटर जोडले जाईल.
-एस. एम. लोहारे,
उप कार्यकारी अभियंता, महावितरण
------
ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्र बसविण्यात आली आहेत. या यंत्राची चाचणी घेण्यासाठी ठराविक दाबाचा वीज पुरवठा लागतो आहे. वीजपुरवठा उपलब्ध होताच चाचणी घेऊन ऑक्सिजन निर्मिती सुरू करता येईल.
-दिलीप वडे,
ठेकेदार.
210621\1822-img-20210621-wa0026.jpg
शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण होत आहे. वीज पुरवठा नसल्याने त्या यंत्राची चाचणी रखडली आहे.