विद्युत पंपाचे वीज जोड तोडले
By Admin | Updated: June 27, 2014 23:28 IST2014-06-27T23:28:11+5:302014-06-27T23:28:11+5:30
राहुरी : मुळा धरणावरील विद्युत पंपाचे वीज जोड तोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पाटबंधारे खात्याला दिला आहे़
विद्युत पंपाचे वीज जोड तोडले
राहुरी : मुळा धरणावरील विद्युत पंपाचे वीज जोड तोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पाटबंधारे खात्याला दिला आहे़ दिवसेंदिवस धरणाच्या पाण्याची पातळी खाली जात असून पिण्यायोग्य पाणीसाठा केवळ ६१२ दशलक्ष घनफूट असल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे़
मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांचे आवर्तन संपल्यानंतर धरणाचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आहे़ पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा आदेश देण्यात आला आहे़ जून महिना कोरडा गेल्याने नवीन पाण्याची आवक झाली नाही़ गेल्या वर्षी याच कालावधीत ८०० दशलक्ष घनफूट पाणी धरणात आले होते़ यंदा पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याच्या पातळीत घट होत आहे़ कार्यकारी अभियंता आनंद वडार, उपअभियंता नवलाखे, धरण अभियंता आऱ एल़ कांबळे यांच्यापुढे पाणी नियोजनाचे आव्हान आहे़ विद्युत पंपांचे वीज जोड तोडल्यामुळे काही प्रमाणात पाणी वाचणार आहे़
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नगर जिल्ह्यात पावसाचे आगमन होण्याचे संकेत आहेत़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने हजेरी लावल्यानंतर सुरुवातीला वरती असलेले छोटे बंधारे भरतात व त्यानंतर पाण्याचे धरणाक डे आगमन होते़ त्यामुळे २० जुलैनंतर धरणाकडे पाण्याची आवक होऊ शकते असे गृहीत धरण्यात आले आहे़
शेतीपंप बंदसाठी तहसीलदारांचे पथक
अकोले: पाण्याचे आगार असलेल्या तालुक्याला भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून धरणांचे पोट खपाटिला गेले आहे. शिल्लक पाणी केव्हांच पिण्यासाठी राखिव झाले आहे. धरण व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या पाणलोटातील शेतीपंपाकडून होणारा पाणी उपसा थांबवण्यासाठी तहरिलदार यांचे पथक कार्यान्वीत झाले असून उद्या पासून धरणांमधील विद्युतपंपावर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
आजमितीस भंडारदरा धरणात ९८१ दशलक्षघनफुट पाणीसाठा आहे. निळवंडे धरण कामा निमित्त रीते करण्यात आले होते माञ मोरीचे काम अचानक बंद झाल्याने आज दुपारी २ वाजता भंडारदरा धरणातून निळवंडेत ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडेत सध्या १४५ दलघफु पाणी असून त्यात अधिक पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे. आढळा, सांगवी, पाडोशी, बोरी, आंबीत, देवहंडी, बलठाण, टिटवी, वाकी, कोथळे आदि सर्वच लघुपाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची पातळी मृतसाठ्याच्या खाली गेली आहे. तालुक्यात पाणी टंचाईचे सावट गडद झाले असून मन्याळे, पळसुंदे, मुथाळणे, शेणीत, शिंदे, धामनवण,जायनावाडी, बिताका, एकदरे, मुतखेल, शेरणखेल, बाभुळवंडी आदि १२ गावे व ४५ वाड्यांना १२ टँकरने ५१ खेपा पाणी दिले जात आहे. तसेच जुलैच्या पहिल्या आढवड्यात चाराटंचाईचे सावट येण्याची शक्याता आहे. प्रशासनाने सावध पविञा घेतला असून धरणांमधील शेतीपंपाच्या मोटारींवर कारवाई केली जाणार आहे. या अनुसंगाने सांगवी-३७, पाडोशी-१७, बोरी-४५, देवठाण-४७ आदिंसह चंदगीरवाडी, शिरपुंजे, एकदरा तलाव या मधील शेतीपंपावर कारवाई होणार आहे. तहसिलदार यांचे अध्यक्षतेखाली महसूल,पाटबंधारे, विजवितरण व पोलिस यांचे पथक तयार करण्यात आले आहे. तसेच जलसंपदाचे अभियंता किरण देशमुख, रामनाथ आरोटे, प्रशांत वाकचौरे, खुळे यांचे दक्षता पथक ही कार्यान्वीत आहे.
कोट- पावसा अभावी पेरण्या खोळबल्या असून समशेरपूर व अकोले मंडल कार्यक्षेञात पेरणीचा आकडा निरंक असल्याचे मंडल कृषी अधिकारी बी.बी. देशमुख व विकास जोशी यांनी सांगितले. कोतूळ मंडल कार्यक्षेञात ४५ ते ५० टक्के पेरण्या झाल्याचे मंडल कृषी अधिकारी अस्वले यांनी तर राजूर मंडल कार्यक्षेञात १५ ते २० टक्के पेरणी झाल्याचे मंडल कृषी अधिकारी धांडे यांनी सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)