नगराध्यक्षांनी पदाचा राजीनामा द्यावा
By Admin | Updated: August 24, 2016 00:43 IST2016-08-24T00:16:24+5:302016-08-24T00:43:34+5:30
शिर्डी : उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी साधनाताई लुटे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी या करीता राजीनामा दिला, तसाच नगराध्यक्षा अनिता जगताप यांनीही

नगराध्यक्षांनी पदाचा राजीनामा द्यावा
शिर्डी : उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी साधनाताई लुटे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळावी या करीता राजीनामा दिला, तसाच नगराध्यक्षा अनिता जगताप यांनीही मनाचा मोठेपणा दाखवत राजीनामा देऊन आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी, अशी मागणी नगरसेवक व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभय शेळके पाटील यांनी केली़
नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली तर महिनाभरात शिर्डीचे चित्र बदलवून टाकू अशी ग्वाही देतांनाच याबाबत नगराध्यक्षांनी दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आपण वेगळा निर्णय घेऊ अशी गर्भित धमकीही शेळके यांनी नगराध्यक्षा जगताप यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे़
या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात जनतेशी निगडीत जेवढी दैनंदिन कामे झाली नाहीत ती सर्व कामे केवळ एका महिन्यात करुन दाखवेल, याची आपल्यासह संपूर्ण शिर्डी शहरातील नागरिकांना खात्री आहे.
शहरात नवीन रस्ते, नवीन पिण्याचे पाणी योजना, नवीन ड्रेनेज हे विषय सोडले तर कचरा, स्वच्छता, अतिक्रमण, पिण्यासाठी नियमित वेळेत पाणी, तत्पर प्रशासन, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, भिकारी, नागरिकांना शिस्त लावणे, संरक्षण, शहरातील बेकायदा प्रवासी वाहतूक हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाहीही शेळके यांनी दिली आहे़
हे पत्र आपण नगराध्यक्षांना देत असलो तरी आपला रोख नगराध्यक्षांचे पतीराज विजय जगताप यांच्याकडे असून त्यांनी याबाबत मनाचा मोठेपणा दाखवत दोन दिवसात सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ व नंतर त्यापासून मागे हटणार नाही असा इशाराही शेळके यांनी दिला आहे़
(तालुका प्रतिनिधी)