गुन्ह्यातील जप्त दागिने पोलिसाने ठेवले गहाण, काढले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:32+5:302021-07-02T04:15:32+5:30
अहमदनगर : विविध गुन्ह्यांत जप्त केलेले सोन्याचे दागिने पोलीस कर्मचाऱ्याने चक्क फायनान्स बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले. एवढेच ...

गुन्ह्यातील जप्त दागिने पोलिसाने ठेवले गहाण, काढले कर्ज
अहमदनगर : विविध गुन्ह्यांत जप्त केलेले सोन्याचे दागिने पोलीस कर्मचाऱ्याने चक्क फायनान्स बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले. एवढेच नव्हे, तर गुन्ह्यात जप्त असलेले रोख ५ लाख ४६ हजार ६४० रुपयेही त्याने स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नगर तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे याने हे कृत्य केले असून त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी २९ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश शिंदे हा नेमणुकीला असताना त्याच्याकडे विविध गुन्ह्यांतील जप्त मुद्देमालाच्या नोंदी ठेवण्याचे कामकाज होते. शिंदे याने ७ मार्च २०२० पासून तालुका पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांत जप्त केलेले सोन्याचे दागिने फायनान्स बँकेत तारण ठेवून त्यावर कर्ज घेतले. तसेच जप्त केलेली ५ लाख ४६ हजार ६४० रुपयांची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरून न्यायालयाचा विश्वासघात केला आहे.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सानप यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे याची तब्येत अचानक बिघडल्याने पुढील मुद्देमाल तपासणी करता आली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भिंगार कॅम्पचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख पुढील तपास करीत आहेत.