पोलीस शोधताहेत बोठे याचा इतिहास
By | Updated: December 6, 2020 04:22 IST2020-12-06T04:22:22+5:302020-12-06T04:22:22+5:30
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याची पार्श्वभूमी तपासण्यास पोलिसांनी ...

पोलीस शोधताहेत बोठे याचा इतिहास
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याची पार्श्वभूमी तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तसेच जरे यांनी बोठे याच्या विरोधात याआधी कुठे तक्रारी केल्या होत्या, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबाबत सर्व माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. बोठे हा जरे यांच्या संपर्कात कधी आला, त्याचे जरे यांच्याशी काय नाते होते, या दोघांमध्ये वितुष्ट नेमके कोणत्या कारणामुळे आले, तसेच बोठे याने जरे यांचा कसा छळ केला, या बाबतही पोलीस सगळीकडून माहिती घेत आहेत. हत्या झाल्यानंतर जरे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. जरे यांच्या मोबाइलमधूनही पोलिसांना बोठे याच्या विरोधात महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बोठे याने हनीट्रॅपसंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यामध्ये त्याने नगर शहरातील अनेक मोठ्या लोकांच्या नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. हे हनीट्रॅप प्रकरण आणि हत्याकांडाचा संबंधही पोलीस शोधत आहेत.
.............
बोठेचे साथीदार पोलिसांच्या रडारवर
जरे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी सागर भिंगारदिवे याला अटक केली. बोठे हाच हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचे भिंगारदिवे याने पोलिसांना सांगितले. पोलिसांना बोठे याच्याविरोधात पुरावेही मिळाले. मात्र, त्याला अटक करण्याआधी तो पसार झाला. बोठे हा नगर शहरातून कसा प्रसार झाला, त्याने कोणत्या वाहनाचा वापर केला, पसार होण्यात त्याला कोणी मदत केली, तो कोणाच्या संपर्कात होता, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. त्यामुळे बोठे याला मदत करणारेही येणाऱ्या काळात अडचणीत येणार आहेत.