पोहेगावातील उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST2021-07-27T04:22:17+5:302021-07-27T04:22:17+5:30
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहेगाव दूरक्षेत्र सुरू व्हावे, या मागणीसाठी पोहेगावचे सरपंच अमोल औताडे ...

पोहेगावातील उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव येथे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पोहेगाव दूरक्षेत्र सुरू व्हावे, या मागणीसाठी पोहेगावचे सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामस्थांसह पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयासमोर सोमवारी (दि. २६) उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाला बसण्याच्या तयारीत असतानाच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी फौजफाट्यासह हजर होत पोहेगाव दूरक्षेत्र पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह कायमस्वरूपी सुरू राहील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
शिवसेना नेते नितीन औताडे म्हणाले, उपोषण आणि आंदोलनाची आम्हाला हौस नाही. मात्र, खुलेआम दारू विक्री, मटका जुगार, चोऱ्यामाऱ्या यामुळे गावचे वातावरण दूषित होते. साडेचारशे लहान-मोठे दुकानदार पोलीस ठाणे व गावच्या ग्रामपंचायतवर विश्वास ठेवून व्यवसाय करतात. मात्र, पोलीस दूरक्षेत्र सुरू नसल्याचे चोऱ्यामाऱ्या व अवैध धंदे करणाऱ्यांचे फावले जाते. गावात व्यापारी असोसिएशनने दीड वर्ष रात्रीचा पहारा देत गावची सुरक्षा केली. मात्र, पोलीस स्टेशनने कुठलेच सहकार्य न केल्यामुळे रात्रीचा पहारा बंद झाला. आणि त्यानंतर लगेच एटीएम फोडून चोरट्यांनी आठ लाख रुपये लांबवले. पोलीस स्टेशनने चांगल्या प्रकारे सहकार्य केले तर गावात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, असे ते म्हणाले. यावेळी उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र औताडे, ज्ञानेश्वर गांगुर्डे, संदीप औताडे, निवृत्ती औताडे, विनायक मुजगुले, वसंत औताडे, रमेश झांबरे, चांगदेव शिंदे, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, रवींद्र भालेराव, प्रमोद भालेराव, राजेंद्र कोल्हे, पोलीस कर्मचारी पी. एन. मकासरे उपस्थित होते.