अल्पसंख्याक दर्जामुळे स्वतंत्र धर्माचे स्थान
By Admin | Updated: July 31, 2014 00:40 IST2014-07-30T23:29:13+5:302014-07-31T00:40:12+5:30
जैन समाज कार्यशाळा : ललित गांधी यांचे प्रतिपादन

अल्पसंख्याक दर्जामुळे स्वतंत्र धर्माचे स्थान
अहमदनगर : अल्पसंख्याकदर्जा मिळाल्याने जैन समाजातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना मोठे आर्थिक फायदे व सवलती मिळणार आहेत. जैनांच्या धार्मिक संस्था, मालमत्तांना संरक्षण मिळणार आहे. मात्र या फायद्यांपेक्षाही जैन समाजाला प्रथमच स्वतंत्र धर्म म्हणून केंद्र सरकारची मान्यता मिळाली. हा फायदा अतिशय महत्त्वाचा असून आता जैन समाजाने एकजूट राखून अल्पसंख्याक दर्जाचा फायदा समाजाला, गरजूंना होण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज करावेत, असे आवाहन राष्ट्रीय जैन अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंगळवारी कापड बाजारातील जैन मंदिरात झालेल्या कार्यशाळेत बोलताना केले.
जैन समाजातील श्वेतांबर, दिगंबर, स्थानकमार्गी कच्छी, तेरापंथी अशा सर्व पंथांसाठी प्रथमच एकत्रितरित्या आयोजित कार्यशाळेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जैन समाजाचे ज्येष्ठ नेते हस्तीमल मुनोत, सुवालाल गुंदेचा, पोपटशेठ बोथरा, संदीप भंडारी, हिंमतभाई शाह, संजय चोपडा, महावीर बडजाते, मीनाताई मुनोत, विपुल शेटिया, जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा, बाबुशेठ बोरा, सुभाष गुंदेचा, वसंत लोढा, संयोजक सुधीर मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. ते म्हणाले, जेवढी आपण जास्त मागणी करू तेवढी सरकार पुढील अंदाजपत्रकात जास्तीत जास्त तरतूद करेल. आपण मागणीच केली नाही तर सध्या केंद्राने केलेली तरतूद कमी होण्याची भीती असते.
ललित गांधी यांच्या समवेत आलेल्या राष्ट्रीय संघटनमंत्री संदीप भंडारी, कमलेश पुनमिया आणि कश्मीरा शाह यांचा खा.गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जैन सक्षमीकरण या अल्पसंख्याक योजनांच्या माहिती पुस्तकाचे प्रकाशन खा.दिलीप गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
खा. गांधी म्हणाले, २४ टक्के इन्कमटॅक्स भरणारा जैन समाज सधन असला, तरी ३० टक्के समाज दारिद्र्यरेषेखाली आहे. गरीब, मध्यमवर्गीयांची मोठी संख्या आहे. जैन समाज स्वाभिमानी आणि कष्टाळू आहे. त्यांना आता या योजनांचा फायदा मिळावा, कोणी अडवणूक करत असेल, तर सर्व शक्ती वापरून समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील राहू. राष्ट्रीय संघटन मंत्री संदीप भंडारी यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)
गांधी यांना
मंत्रिपदाची मागणी
भाजपात एकमात्र जैन खासदार दिलीप गांधी आहेत. त्यांच्या शब्दाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वजन असल्याने आणि ते नगरचे खासदार असल्याने देशासह नगरच्या जैन समाजाला फायदा होणार आहे. त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे ललित गांधी यांनी सांगितले.